१९८० नंतरच्या काळात लहू कानडे यांची कविता पुढे आली. आत्मभानाचा सशक्त आविष्कार करणाऱ्या या कवितेची नाळ विद्रोही युगजाणिवेशी आहे. लहू कानडे यांच्या कवितेला असणारा स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यव्यवस्थेचा संदर्भ या कवितेचा महत्त्वाचा गुणविशेष आहे. क्रांतिपर्व (१९८३ आणि टाचा टिभा हे लहू कानडे यांचे सुरुवातीचे दोन कवितासंग्रह याची साक्ष देतात. याचाच पुढचा टप्पा म्हणजे त्यांचा अलीकडे २०१२ मध्ये प्रकाशित झालेला ‘तळ ढवळताना’ हा कवितासंग्रह होय.
ज्ञान-संपत्ति-अधिकारांपासून दूर ठेवण्यात आलेल्या वर्गाला भारतीय राज्यघटनुळे मानवी अधिकार मिळाले. त्यांच्या कर्तृत्वाला संधी मिळून त्यांच्या अभिव्यक्तीची कवाडे खुली झाली.