सादर निरोप
नंदा खरेंनंतर एका वर्षाच्या आत ‘आजचा सुधारक’ने आणखी दोन खंदे विचारवंत गमावले.
सुनीती देव
लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ता, विवेकी विचारवंत, आणि ‘आजचा सुधारक’च्या संपादकमंडळात अनेक वर्षे कार्यरत सुनीती देव ह्यांचे २ मे २०२३ ला निधन झाले. अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयात त्या तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापिका होत्या. परंतु नागपुरात त्यांची ओळख फार वेगळी होती. सुनीतीताई जगन्मित्र होत्या. त्यांचे सोबत असणे अतिशय आश्वासक वाटे. त्यांचे हास्य केवळ त्यांच्यापुरते नसून संपूर्ण वातावरणात आह्लाद पसरवणारे होते.
‘आजचा सुधारक’च्या अगदी सुरुवातीपासून (तेव्हाचा, नवा सुधारक) त्या संपादकमंडळात तर होत्याच, पण तेव्हा वर्गणीदारांची यादी बनवण्यापासून, पत्ते आणि तिकिटे चिकटवून अंक पोस्टात टाकण्यापर्यंतच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या.