जगाच्या परिस्थितीचे आकलन करून घेताना त्यातल्या अनेकानेक लोकसमूहांना आश्वासक सहजीवनाची शक्यता निर्माण झाल्याचे कितपत जाणवते किंवा हे जाणवण्यासारखी परिस्थिती आहे असे म्हणता येऊ शकते, हे अर्थातच उलगडायला हवे आहे. कारण जागतिक परिस्थितीतल्या लोकसमूहांनी ज्या तऱ्हेच्या व्यवस्थांचे व त्याच्या राजकीय स्वरूपांचे अनुसरण केले व त्यांचा अनुभव घेतला, अर्थात तो अनुभव अद्याप घेतला जातोहो आहेच, त्यातून आश्वासक सहजीवनाची परिपूर्ती करता आली किंवा काय, हा प्रश्न उपस्थित झालेलाच आहे.
जगातल्या कोणत्याही व्यवस्थेत राजकीयतेचे जे प्रमाण वाढले आहे व त्याचे महत्त्व निर्माण झालेही आहे, ते अपरिहार्यतेतलेच जरी मानले जात असले, तरी राजकीय व्यवस्था आश्वासक सहजीवनाची पूर्तता करण्याच्या पात्रतेची झाली आहे, किंवा ती त्या पात्रतेची होऊ शकेल, असे सर्वच व्यवस्थेतले अंतर्विरोध ज्या एका प्रमाणात उफाळून वर येताना दिसते आहे, त्यावरून तरी वाटत नाही.