मासिक संग्रह: फेब्रुवारी, १९९९

संपादकीय

मागच्या अंकात पुष्कळ पत्रे प्रकाशित झाली. त्यांपैकी काही पत्रांना उत्तरे देण्याची गरज आहे. बारीकसारीक सूचनांचा अगोदर परामर्श घेऊ आणि गंभीर सूचनांचा मागाहून. श्री. मनोज करमरकर ह्यांनी मुखपृष्ठावर कॅप्टन ब्रीज यांचा उतारा छापून काय साधले असा प्रश्न उपस्थित केला आहे आणि श्री. मधुकर कांबळे ह्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या लेखातील उतारे आवर्जून प्रकाशित करावे अशी आम्हाला विनंती केली. ही दोन्ही पत्रे आम्ही कोणता मजकूर पुनःप्रकाशित करतो वा करावा ह्यासंबंधी आहेत. तरी त्या संबंधीचे धोरण पुन्हा एकदा स्पष्ट करतो.
आमच्या मासिकाच्या मुखपृष्ठावर एखाद्या जुन्या अथवा अल्पपरिचित पुस्तकातील जो भाग आम्हाला स्वतःला अंतर्मुख करतो, विचार करायला लावतो, अशा मजकुरातला एक अंश प्रकाशित करण्याचा आमचा प्रघात आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

निरपराध्यांना आणि गुन्हेगारांना एकच न्याय?
संपादक, आजचा सुधारक
स.न.वि.वि.
श्री. दत्तप्रसाद दाभोलकर यांचे ‘मी नथुराम…. वर बंदी नको’ ह्या शीर्षकाचे पत्र वाचले. मी नथुराम…’वर बंदी नको असे माझेही मत आहे. परंतु हे मत नोंदवताना श्री. दाभोलकरांनी केलेला युक्तिवाद मात्र मला पटत नाही. गांधीजींचा खुन ही एक ऐतिहासिक घटना होती आणि नथुराम ही एक ऐतिहासिक व्यक्ती होती असे म्हणून दाभोलकरांनी गांधी आणि गोडसे या दोघांनाही एकाच मापाने मोजण्याचा प्रयत्न केला आहे.
गोडसेचे आधीचे चरित्र निश्चितच वाईट नव्हते. पण तेवढ्याने त्याने केलेल्या गांधींच्या खुनाला मूल्याधिष्ठित म्हणता येत नाही.

पुढे वाचा

स्फुटलेख (१) आपली प्रत्येक कृती राहणीमान वाढविण्यासाठी

मोठ्या औद्योगिक प्रकल्पांमुळे देशाचा विकास होईल ही कल्पना अमान्य असलेले बरेच लोक आहेत. भारताचा आर्थिक विकास व्हायचा असेल तर ग्रामोद्योगाशिवाय, विकेंद्रीकरणाशिवाय गत्यंतर नाही असे ते मानतात. माजी अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी नुकतेच अशा अर्थाचे विधान केलेले वाचले. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास होतो तो तेथे राणाच्या लोकांचे राहणीमान सुधारल्यामुळे होतो. तेथल्या लोकांजवळ पैसे कितीही कमी जास्त असले तरी त्यामुळे फरक पडत नाही. राहणीमान सुधारण्याचा अर्थ सगळ्या लोकांच्या आवश्यक गरजा पूर्ण होऊन तद्देशवासीयांना एकमेकांच्या सुखोपभोगात भर घालणे. ही भर दोन प्रकारची असते. सर्वांना एकतर अधिक फावला वेळ मिळतो किंवा फावला वेळ घ्यावयाचा नाही असे ठरविल्यास त्या अवधीमध्ये अधिक उत्पादन केल्यामुळे उपभोगाचे प्रमाण वाढते.

पुढे वाचा

असामान्य मानवी जीवनाचा निर्देशक, जन्मकाळ!

आजचा सुधारक’ (९:४, १२३-१२४) मध्ये मी मांडलेल्या एका कल्पनेवर अभ्युपगमावर (hypothesis) भरपूर प्रतिकूल प्रतिक्रिया होण्याची मी वाट पाहत होतो. कारण आ.सु.च्या माध्यमातून चर्चा करण्यासाठीच मी तो लेखप्रपंच केला होता. परंतु केवळ श्री. पंकज कुरुळकर यांच्याखेरीज (आ.सु., ९:८ पृष्ठ २५२, २५३) कोणी या विषयावर आपले मत जाहीरपणे व्यक्त केलेले नाही. पुण्याचे प्रा. प्र.वि. सोवनी यांनीही मी मांडलेली कल्पना हास्यास्पद आहे असे खाजगी पत्रातून कळविले आहे. कदाचित खरोखरच माझी कल्पना हास्यास्पद असू शकते. परंतु मी माझ्या अभ्युपगमावर ठाम आहे कारण सर्वच नवीन कल्पनांची प्रारंभी अशीच वाट लावण्यात येते असे इतिहासात अनेक दाखले आहेत.

पुढे वाचा

एका जुन्या वादाचा शेवट-फलज्योतिष : ग्रहांसहित आणि ग्रहांविरहितही; पण दोन्ही प्रकार भ्रामक!

फलज्योतिषाचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारच्या फलज्योतिषातले ग्रह सुबुद्ध असतात व त्यांना फलज्योतिषाचे नियम ठाऊक असतात. दुसऱ्या प्रकारच्या फलज्योतिषाला आकाशातल्या ग्रहांची गरज नसते. ग्रहांची नावे तेवढी त्यात वापरलेली असतात! माझे हे विधान वाचकांना चमत्कारिक वाटेल, पण ते अक्षरशः खरे आहे हे मी सिद्ध करणार आहे.

वादापुरती मान्य अशी गृहीतके
(१) ग्रहांचे फलज्योतिषीय प्रभाव पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर सतत पडत असतात. ग्रहांचे प्रकाश-किरण मात्र फक्त अर्ध्या भागावरच पडत असतात हे लक्षात ठेवावे. (२) प्रत्येक ग्रहाच्या प्रभावात १२ घटक समाविष्ट असतात. (३) प्रत्येक घटक कुंडलीतल्या एकेका स्थानाशी निगडित असतो, व (४) कुंडलीच्या स्थानाचे फल त्या घटकामुळे मिळते.

पुढे वाचा

अमेरिकेत आजचा सुधारक

काही एका कौटुंबिक कारणाने अमेरिकेला जायचा योग आला. जाताना मोहनींकडून तिथल्या वर्गणीदारांची यादी घेतली. म्हटले, विचारू कसा वाटतो आजचा सुधारक ? खरोखरी वाचता की कोणाच्या भिडेखातर १० डॉलर्स भरले, असे झाले ? यादी तीसेक जणांची होती. पण काही वाचक निश्चल होते. वर्ष उलटले, स्मरणपत्रे गेली तरी हूँ की चूं नाही. न्यू जर्सीत ४ जण, त्यातली एक मुलगीच मधू. तिने इंटरनेटवरून पत्त्यावरून एकदोन फोन नंबर काढून दिले. एका सकाळी फडणिसांना फोन केला. उत्तर आले, ते आंघोळीला गेले आहेत. नंबर ठेवून द्या. तेच फोन करतील.

पुढे वाचा

सत्याविषयीचा प्रकारभेद गैरलागू

प्रा. अनिलकुमार भाटे यांस,
स.न.
आपण माझ्या विवेकवादावरील लेखांसंबंधी (आ.सु. जानेवारी ९८, पृ. ३०८) विचारले. या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यापूर्वी या उत्तरांतील त्रोटकपणाबद्दल आपली क्षमा मागतो. तीन वर्षांपूर्वी मला झालेल्या आजारानंतर माझी लिहिण्याची ताकद भराभर कमी होत गेली आहे, आणि लिहिणे कष्टप्रद झाले आहे.
माझ्या लेखांसंबंधी आपले अवलोकन (observation) असे आहे की त्याचा सर्व भर Anglo-American तत्त्वज्ञानावर आहे. आपला हा समज कशामुळे झाला असेल ते मला सांगता येत नाही. कारण विवेकवाद ही सर्वच तत्त्वज्ञानांत समान असणारी विचारसरणी आहे अशी माझी समजूत आहे.

पुढे वाचा

चर्चा – विवेक, श्रद्धा आणि विज्ञान

नोव्हेंबर १९९८ च्या आ.सु. च्या अंकातील प्रा. दि.य. देशपांडे यांच्या ‘विवेकाचे अधिकार’ हा लेख वाचून सुचलेले विचार शब्दांकित करीत आहे.
मूळ लेखामागील भूमिकेत खालील कल्पना अध्याहृत आहेत असे वाटते:
अ) “सत्य” हे स्थलकालनिरपेक्ष स्वरूपाचे असते.
ब) अशा प्रकारचे सत्य कोणालाही समजून घेणे किंवा अनुभवणे शक्य असावे.
क) सत्यात व्याघात असता कामा नये. निरनिराळ्या श्रद्धाविषयांमध्ये व्याघात दिसतो त्यामुळे त्यांच्या सत्यतेबद्दल शंका निर्माण होते.
विज्ञानाच्या क्षेत्रातली काही उदाहरणे घेऊन अ, ब आणि क या कल्पना तपासून पाहणे उपयुक्त किंवा निदान मनोरंजक ठरावे ही आशा.

पुढे वाचा

जातिव्यवस्थेमधील दोष

वतनपद्धति ही जातिधर्माच्या अपार कुंडाचा गांवापुरता एक लहानसा हौद आहे. तिने जसे वतनदारांना व्यक्तिशः व समुच्चयाने तुटक, स्वार्थी व कमजोर करून एकंदर गांवगाड्याचा विचका केला, तीच गति एकंर हिंदुसमाजाची केली. जे आडांत तेच पोहळ्यांत येणार. जे धंदे ज्या जातीच्या हाती पडले ते तिच्या बाहेर जाऊं नयेत, ह्या धोरणाने जातधंदे धर्माच्या पदवीस चढविले. धंदेवाल्या जातींतील व्यक्तींचा लोभ वाढून त्यांना असे वाटू लागलें कीं, कांहीं प्रदेशापुरता का होईना, जातधंदा आपल्या विवक्षित कुळांच्या बाहेर जाऊ देऊ नये. त्यांच्या ह्या आपमतलबी धोरणाने वतन निर्माण केले.

पुढे वाचा