मासिक संग्रह: ऑगस्ट, २०००

पत्रसंवाद

प्रत्येक व्यक्तीच्या समाज–गटाच्या किंवा समाजाच्या जीवनामध्ये सतत भिन्न प्रकारच्या आर्थिक समस्या निर्माण होत असतात. त्या स्वतःच्या आर्थिक स्थितीतील बदलांमुळे किंवा इतरत्र (बाह्य) होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होतात. त्यांचे परिणामही आपल्यावर काही प्रमाणात प्रत्यक्ष आणि काही प्रमाणात अप्रत्यक्षपणे घडतात त्या त्या प्रमाणात त्या समस्यांमध्ये आपला सहभाग (involvement) असतो. ज्या समस्यांशी आपला थेट संबंध असतो त्यांच्याबद्दलची आपली जाण चांगली असते. त्यामुळे त्यासंबंधीची इतरांची मते, सरकारी धोरणे कंपन्यांची धोरणे इत्यादी गोष्टी कितपत योग्य आहेत हे आपल्याला चांगले माहीत असते. परंतु थेट संबंध न येणाऱ्या क्षेत्रांतील घडामोडींचा तपशील आपल्याला कमी माहीत असतो.

पुढे वाचा

विद्वेषाने विद्वेष वाढतो

‘आजचा सुधारक’च्या जून २००० च्या अंकात नागपूरच्या दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या शुद्धीकरणाच्या संदर्भात दोन पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. माझी ही प्रतिक्रिया.
विसाव्या शतकात भारतात (की हिंदुस्थानात?) लो. टिळक, गोखले, म. गांधी, पं. नेहरू स्वा. सावरकर, भारतरत्न आंबेडकर आदी थोर व्यक्ती होऊन गेल्या. त्यांच्याविषयी सर्व भारतीयांना (केवळ हिंदूंनाच नव्हे) पुरेसा आदरभाव असणे अपेक्षित आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची थोरवी भारतीय घटनेच्या पुस्तकातच बंदिस्त आहे का? रा. स्व. संघाच्या प्रमुखांनी घटनेच्या समीक्षेच्या संदर्भात हिंदुत्वाची पुष्टी करणारे विधान करून डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातल्याबरोबर ब्राह्मणी पद्धतीने ‘शांत पापम्’ म्हणून पुतळ्याला स्नान घालण्यात कोणता पुरोगामीपणा आहे ?

पुढे वाचा

डॉ. आंबेडकर पुतळा-प्रक्षालन : एक लाक्षणिक कृती

विवेकवाद वाढवावयाचा असेल तर बौद्धिक लढ्यांबरोबर लाक्षणिक कृत्यांच्या माध्यमातूनही जनजागरणाचे प्रयत्न करावयाचे असतात ह्या श्री. भा. ल. भोळे यांच्या मताशी मी सहमत आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकर पुतळा धुण्यामागे हेच कारण होते. आ. सु.च्या सल्लागार–मंडळातून श्री. भोळे यांना काढण्याची चूक आजचा सुधारक करणार नाही याची मला खात्री वाटते.
भारताला पाकिस्तानसारख्या धार्मिक व फासिस्ट राज्यकारभाराकडे घेऊन जाण्याचा संघाचा मानस आहे. तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध लिहिणाऱ्या श्री. बा. के. सांवगीकर व श्री. रवीन्द्र विरूपाक्ष पांढरे यांना समजला नसेल असे नाही. विवेकवादाचा मुखवटा घालून संघिस्ट प्रवृत्तीला पोषक अशी कृती करणारे हे अरुण शौरी यांचे चेले भारतात व इथे अमेरिकेतही कमी नाहीत.

पुढे वाचा

लैंगिक स्वातंत्र्य

ह्या अंकामध्ये प्रा. ह. चं. घोंगे यांचा ‘सखीबंधन’ नावाचा लेख प्रकाशित झाला आहे. त्या लेखात मी ज्याचा तात्त्विक पाठपुरावा करतो अशा विषयाचा ऊहापोह त्यांनी केला आहे. स्त्रीपुरुषांचे विवाहबाह्य संबंध प्रस्थापित व्हावेत असे मी पूर्वी प्रतिपादन केले आहे असे श्री. घोंग्यांचे म्हणणे. तसेच ह्या विषयामधले पूर्वसूरी रघुनाथ धोंडो कर्वे ह्यांच्या आणि माझ्या भूमिकांमध्ये काय फरक आहे तो त्यांनी विशद करून मागितला आहे. मला येथे कबूल केले पाहिजे की मी कर्व्यांचे लिखाण फार थोडे वाचले आहे. त्यामुळे अशी तुलनात्मक भूमिका मांडताना माझ्याकडून त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा

सखी-बंधन

माणसात नर मादीचे नवे नाते अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे नाते सखीबंधनातून जडते. सखी-बंधन ही संकल्पना माझी नाही. नाशकाला आजचा सुधारक ह्या मासिकाच्या वाचकवर्गाचा नुकताच मेळावा भरविण्यात आला. लोकेश शेवडे, सुरेंद्र देशपांडे ह्या नाशिककरांनी तो आयोजित केला होता. या मासिकात स्त्रीपुरुषांचे विवाहनिरपेक्ष संबंध स्ढ व्हावेत या निसर्गसमीपतेचा पुरस्कार करणाऱ्या र. धों. कर्व्यांचे लेख नुकतेच प्रसिद्ध झाले होते. नागपूरचे दिवाकर मोहनी याच विचारांचा तात्त्विक पाठपुरावा करणारे लेखक नाशकातील मेळाव्यात उपस्थित होते. या लेखांविषयी साधकबाधक चर्चा मेळाव्याच्या सभेनंतर एका खाजगी मैफलीत रंगली.

पुढे वाचा

नीतीला धर्माकडून प्रेरणा कशी मिळत राहील?

[रिचर्ड पी. फाईनमन हा या शतकातला एक अग्रगण्य भौतिकीतज्ज्ञ. विज्ञानाची चुकतमाकत, तात्पुरती मते बनवत, थोड्याशाच पण अत्यंत भरवशाच्या ज्ञानाकडे जाणारी पद्धत वारंवार इतर अ-वैज्ञानिकांसमोर मांडण्यासाठीही त्याची ख्याती. या पद्धतीवरच्या आग्रहानेच सतत ‘हे मला माहीत नाही’, ‘हे मला समजायला अवघड वाटते’, असे तो म्हणतो — सामान्य माणूस ज्या ठामपणाने ‘हे चूक आहे’, ‘हे तर्कविसंगत आहे’, असे म्हणतो, त्या ठामपणाला फाईनमन हट्टाने सौम्य करतो. त्याने १९६३ साली दिलेल्या तीन ‘जॉन डान्झ व्याख्यानां’चे ‘द मीनिंग ऑफ इट ऑल’ या नावाने पुस्तक निघाले आहे (पेंग्विन, १९९८).

पुढे वाचा

लैंगिक वाङ्मय — एक तुलना (पूर्वार्ध)

(२२ व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या वाङ्मय प्रकाशन मंडळाच्या विनंतीवजा लिहिलेला लेख)
या अवाढव्य विषयाचे समर्पक विवेचन करण्यास जरूर तितकें वाचन आम्ही केलेले नाही, हे प्रथमच सांगणे बरें. असे असूनहि असा विषय लिहावयास घेतला याचे कारण इतकेंच, की या विषयावर लेख लिहिण्याचे विनंतीला दुसऱ्या कोणीही मान दिला नाही. तेव्हा तो अपुरा वाटल्यास तो आमचा दोष नाही.
वाङ्मयांत सामान्यतः जरी फक्त लिखाणाचाच समावेश करण्याची पद्धत आहे, तरी त्या शब्दाचा मूल अर्थ पाहिल्यास त्यांत भाषणाचाही समावेश करणे जरूर आहे आणि कामविषयक बाबतींत याला महत्त्व आहे.

पुढे वाचा

विवेकवादी नीती

आतापर्यंत आपण सत्य-असत्याच्या प्रांतात होतो. पण नीतीचा प्रांत म्हणजे सत्य-असत्याचा नव्हे, तर चांगल्यावाइटाचा किंवा साधु-असाधु गोष्टींचा प्रांत. जिला reason म्हणतात, आणि जिचा पर्याय म्हणून आपण ‘विवेक’ हा शब्द वापरतो, त्याच्या प्रांतातून वेगळ्या प्रांतात प्रवेश करतो आहोत. हे कटाक्षाने सांगावे लागते, कारण reason चे, विवेकाचे क्षेत्र म्हणजे सत्य-असत्याचे क्षेत्र हे मत अठराव्या शतकात डेव्हिड ह्यूम (१७११ ते १७७९) या तत्त्वज्ञाने व्यक्त केले असून ते बरोबर असावे असा माझा समज आहे. ह्यूमनंतर आलेल्या कांट (१७२४-१८०४) या जर्मन तत्त्वज्ञाने दोन reasons आहेत असे मत मांडले, Theoretical Reason (औपपत्तिक विवेक) आणि Practical Reason (व्यावहारिक विवेक).

पुढे वाचा

प्रिय वाचक

प्रचार वाईट, प्रसार चांगला, असे आमचे एक वाङ्मयसेवक विद्वान मित्र म्हणतात. आ. सु. प्रचार-पत्र आहे हा त्याचा अवगुण आहे असे त्यांचे मत आहे. प्रसार हळूहळू होत असतो, आपोआप होतो. प्रचार केला जातो. त्यात भल्याबुऱ्या मार्गांचा विधिनिषेध नसतो. विरोधकांची मुस्कटदाबी केली जाते; कसेही करून आपलेच घोडे पुढे दामटले जाते. मेरी मुर्गीकी एकही टांग अशी हटवादी भूमिका घेतली जाते. असा त्यांचा खुलासा. त्यांनी हा आरोप अनेक वेळा केला, आमच्या सहकाऱ्यांजवळही केला. म्हणून आम्ही कोश उघडून पाहिला. ‘प्रचार’ आणि ‘प्रसार’ हे दोन्ही संस्कृत शब्द आहेत.

पुढे वाचा

संतांचे बंड आणि भक्तीचा मुलामा

‘. . . तरीसुद्धा या बंडाचा (संतांच्या भागवत-धर्माचा) चातुर्वर्ण्यविध्वं-सनाच्या दृष्टीने काहीच उपयोग झाला नाही. भक्तीच्या मुलाम्याने माणुसकीला किंमत येते असे नाही. तिची किंमत स्वयंसिद्ध आहे. हा मुद्दा प्रस्थापित करण्यासाठी संत भांडले नाहीत. त्यामुळे चातुर्वर्ण्याचे दडपण कायम राहिले. संतांच्या बंडाचा एक मोठाच दुष्परिणाम झाला. तुम्ही चोखामेळ्यासारखे भक्त व्हा, मग आम्ही तुम्हाला मानू, असे म्हणून दलितवर्गाची वंचना करण्याची एक नवी युक्ती मात्र त्यामुळे ब्राह्मणांच्या हाती सापडली. दलितवर्गातील कुरकुरणारी तोंडे त्या उपायाने बंद होतात, असा ब्राह्मणांचा अनुभव आहे. सांप्रदायी लोक साधुसंतांच्या चमत्काराच्या दंतकथा शक्य तितक्या अतिशयोक्तीने वर्णन करतात, परंतु साधूंनी प्रतिपादिलेल्या न्यायबुद्धीची, भूतदयेची नि समतावादाची व उदार विचारांची ते हटकून पायमल्ली करतात.

पुढे वाचा