काश्मीर, हिंसा, काश्मिरी पंडित, मुस्लिमप्रश्न
—————————————————————————–
भारत-पाक फाळणीला आता 70 वर्षे होतील. पण काश्मीरमधील पेचप्रसंगाने ही जखम अजूनही भळभळती ठेवली आहे. गेले सहा महिने तर तेथे कर्फ्युच लागलेला होता. लष्करी बळावर आपण काश्मीर भारतात भौगोलिक दृष्ट्या राखू शकू. पण त्यातून उद्भवणारे राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक प्रश्न आपली पाठ सोडणार नाहीत. थेट काश्मीरला जाऊन तेथील विविध जनसमुहांशी थेट संवाद करून तेथील परिस्थितीचा एका पुरोगामी कार्यकर्त्याच्या दृष्टीने धांडोळा घेणाऱ्या रिपोर्ताजचा हा पूर्वार्ध.
—————————————————————————–
1 ऑक्टोबर 2016
राष्ट्र सेवा दलाच्या ट्रस्टीमंडळाने गुजरातमधील उना व काश्मिरमधील सध्याच्या परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी मला पाठविण्याचा निर्णय घेतला म्हणून मी 1 ऑक्टोबर रोजी नागपूर-दिल्ली-जम्मू विमानाने सकाळी 11 वाजेपर्यंत जम्मूला पोहोचलो.