जावेद अख्तर यांना ‘रिचर्ड डॉकिन्स अवॉर्ड’ देण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच जून महिन्यात ‘सेंटर फॉर एन्क्वायरी’ या संस्थेने केली. विज्ञान, धर्मनिरपेक्षता आणि बुद्धिप्रामाण्यवाद या मूल्यांसाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळणार आहे.
एक गीतकार, पटकथाकार म्हणून जावेद अख्तर यांची ओळख प्रत्येक भारतीयाला आहेच. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या तार्किक अंगाची ओळख या ठिकाणी करून देण्याचा माझा प्रयत्न आहे.
जावेद अख्तर यांचा जन्म एका अशा कुटुंबात झाला ज्या घराला साहित्य, कला यांची परंपरा तर होतीच पण शिवाय देशप्रेमाचीही मोठी परंपरा होती. त्यांचे आजोबा फ़जल-हक़-खैरबादी यांनी १८५७च्या उठावात मुस्लिमांनी सहभाग घ्यावा म्हणून फतवा काढला होता.