महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल देशपांडे ह्यांनी लिहिलेले हे खुसखुशीत ललित कोण विसरू शकेल? ह्या तीनही शहरांत राहणार्या लोकांच्या स्वभावातील वैशिष्ट्ये अगदी रंजकपणे मांडणारे त्यांचे लेखन वाचकांना आजही हसवून सोडते. पण आज ह्या तिन्ही शहरातील रहिवाशांचे जीवन हवामानबदलाच्या तडाख्याने अवघड करून टाकले आहे.
समुद्रकिनारी वसलेले मुंबई आणि तिला झोडपणारा प्रचंड पाऊस, पुण्याचे सौम्य हवामान आणि बेताची पर्जन्यवृष्टी आणि नागपूरचा तीव्र उन्हाळा व कोरडे हवामान हे त्या शहरांचे नैसर्गिक स्वभाव आहेत- होते. पण आज बदलत्या हवामानामुळे ह्या तीनही शहरांचे जनजीवन वारंवार विस्कळीत होत आहे; आणि मुख्य म्हणजे समाजातील विभिन्न स्तरांतील लोकांना हा तडाखा वेगवेगळ्या तीव्रतेने सहन करावा लागतो आहे.

