संगीताचा नवरा एका कंपनीत नोकरी करतो. त्याची कंपनी घरापासून दहा-बारा किलोमीटर अंतरावर आहे. कंपनीत जाऊन परत यायला आपल्या बाईकमध्ये त्याला रोज साधारण अर्धा लीटर पेट्रोल टाकावे लागते. म्हणजे रोजचे जवळपास चाळीस रुपये खर्च होतात. महिन्याचे साधारण एक हजार रुपये. दहा-बारा हजार रुपये पगारावर काम करणाऱ्या संगीताच्या नवऱ्याला प्रवासाचे हे हजार रुपये परवडत नाहीत, पण त्याशिवाय तो कामावर जाऊच शकणार नाही. नाईलाज आहे.
संगीतासुद्धा कामाला जाते, पण ती कुठल्या कंपनीत नोकरीला नाही. रोज सकाळी तीन-चार ऑफिसेसमध्ये साफसफाईचे काम ती करते. डॉक्टरांचे क्लिनिक, सीए साहेबांचे ऑफिस, कोचिंग क्लासेस, अश्या ठिकाणी तिला सकाळी दहा वाजेपर्यंत काम संपवावे लागते.