जाती आणि निसर्गाचे दोहन
भारताच्या सर्वच भागांमध्ये संकलक जीवनशैलीला ‘संपवून’ स्थिर शेतीची शैली घडली नाही. गंगेच्या तीरावर पुरांचा धोका, पूर्व घाट आणि सह्याद्रीच्या आसपास समतल जमिनीचा अभाव, तराई भाग डासांनी आणि दलदलींनी ग्रस्त, काही क्षेत्रांत पाऊस बिनभरवशाचा, अशा अनेक अडचणींमुळे या ‘कठिण’ क्षेत्रांमध्ये संकलन-पशुपालन करणारे समाज तगून राहिले. इतर भागांत मात्र शेती स्थिरावली.
शेतीचा प्रसार होत असताना संसाधनांच्या वापरात ‘शहाणपण’ खूपसे ‘वरून’ येत असे. जैन आणि बौद्ध धर्मांच्या अहिंसेला राजाश्रय मिळत होता. नव्याने संकलनाकडून शेतीत येणाऱ्यांना निसर्गावर आघात न करता जगण्याची सवय होतीच.