हिंदू धर्मातील सर्वांत महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी, सणांचा राजाच म्हणा ना! ह्या सणाइतकी आकर्षणे किंवा वैशिष्ट्ये इतर सणांत क्वचितच सापडतील. त्यांतील एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे फटाके. फटाक्यांशिवाय दिवाळी म्हणजे जणू रंगांशिवाय होळी,
फटाक्यांची सुरवात चीनमध्ये झाली हे सर्वश्रुत आहे. चीनमध्ये प्राचीन काळी भूत-पिशाच्च-सैतान ह्यांना मोठे आवाज करून घालवण्यासाठी फटाके उडवत असत. म्हणजे फटाक्यांचे उगमस्थान अंधश्रद्धा हे होय. पण भारतात जे पूर्वापार फटाके वाजविले जातात ते मजा म्हणून. पूर्वी फटाके फक्त दिवाळीतच वाजवले जात. पण आजकाल फटाके लावण्याचे ‘प्रसंग’ इतके वाढले आहेत की फटाके फक्त दिवाळीतच वाजतात की सकाळी-संध्याकाळी, उन्हाळी-हिवाळी, असा प्रश्न पडतो.
Category «इतर»
मीमांसा: सुखदुःखाची
‘सुख पाहतां जवापाडे, दुःख पर्वताएवढे’ असे तुकाराम महाराज म्हणाले! बहुधा सर्वांचाच अनुभव याहून वेगळा नसावा. सुख किंवा दुःख हे अनुभवावे लागते. अनुभव घ्यायचा तर पंचेंद्रियांमार्फत आणि मनामार्फतच ह्याचा अनुभव घेता येतो. सर्वसामान्यांची मजल ‘मन’ आणि ‘इंद्रिये’ यांच्या पलिकडे जात नाही. आणि यांच्या पलिकडे जाता येते किंवा यांच्या पलिकडेच खरे सुख आहे असे सांगणाऱ्यांना अध्यात्म-वादी म्हणतात. सर्वसामान्य माणसे काय किंवा अध्यात्मवादी काय दोघांनाही दुःख नको असते आणि फक्त सुखच सुख हवे असते. उत्तम आरोग्य, चांगली विद्या किंवा कला, भरपूर पैसा आणि इस्टेट, सुशील-सुंदर बायको किंवा नवरा, उत्तमोत्तम कपडे आणि दागदागिने, गुणवान आणि कर्तबगार संतती यांचा लाभ म्हणजे सुख अशी सर्वसामान्यांची सुखाची कल्पना असते.
मातृत्व
हा लेख वाचण्या आधी वाचकाला थोडी पार्श्वभूमी समजणे महत्त्वाचे आहे. माझी आई मी तीन वर्षांची असताना मृत्यू पावली. एकत्र कुटुंबात माझ्या काकीने मला प्रेमाने वाढवले. म्हणून मला आईची अनुपस्थिती जाणवलीही नसती, पण भोवतालच्या समाजाने ती जाणवून दिली. आईवेगळी मुलगी म्हणून शेजारी, नातेवाईक माझी कीव करीत. वडिलांचे मित्र मुलींना आईची जरुरी असते म्हणून माझ्यासमोर वडिलांना दुसरे लग्न करण्याचा आग्रह करीत. माझ्या बहिणीला व मला शिस्त लावण्याचा वडिलांनी फारसा प्रयत्न केला नाही. आमच्या बेशिस्त वागणुकीचे कारणही इतरांच्या मते ‘आम्हाला आई नव्हती’ हेच होते.
नैवेद्यातील घटक
मुंग्यांना साखर, कबूतरांना ज्वारी, गाईला मूठभर चारा टाकावा आणि धन्य व्हावे तोच प्रकार दारात नाना हेतूंपैकी एका हेतूने आलेल्या अतिथीला खायला-प्यायला देण्याचा. कणात विश्व पाहावे त्याप्रमाणे नैवेद्यात विश्वातल्या असंख्य गरिबांची क्षुधा शमल्याचे स्वप्न पाहावे! गरजूला काम देऊन पुरेसे वेतन द्यावे ही खरी सेवा. अनेकांच्या जमिनी जाताहेत. अनेकाचे रोजगार नष्ट होताहेत, अनेकां-वर नाना पटींनी अन्याय होत आहे त्यासाठी झगडणाऱ्या संस्थांना मदत करणे ही आजची गरज आहे. त्यातूनच गरिबांचा स्वाभिमान जपला जाईल. मागे सरकारने भिकाऱ्यांसाठी वसाहत सुरू केली. भीक देणे गुन्हा ठरवला. पण चार आणे देऊन अजिजी पाहून सुखावणाऱ्या धनिकबाळांनी ती योजना धुडकावून लावली.
खादी (भाग ६)
खादी आणि रोजगार
खादी आणि रोजगार ह्या दोन संकल्पनांची सांगडच बसू शकत नाही. तत्त्व म्हणून खादी स्वीकारल्यानंतर तिचा विचार रोजगारनिर्मितीसाठी करता येणार नाही असे माझे मत आहे. (पण माझे हे मत पूर्णपणे चुकीचे असू शकते आणि त्यासाठी ते तपासून पाहणे आवश्यक आहे.) खादीचा रोजगाराशी ३६ चा आकडा आहे. खादी ही स्वावलंबनासाठी आहे. रोजगार-निर्मितीसाठी नाही. कातणाऱ्याने जमल्यास विणणे शिकले पाहिजे; विणणारा स्वतः कातत असेल तर चांगलेच असे मानणारा हा विचार आहे. खादी ही अर्थव्यवस्थेच्या विकेन्द्रीकरणासाठी आहे. आणि रोजगाराला विकेन्द्रीकरणाचे वावडे आहे. केन्द्रीकरण केल्याशिवाय, कोणत्या तरी स्वरूपात संघटित प्रयत्न केल्याशिवाय रोजगार निर्माण होऊ शकत नाही.
‘ल्यूटाइन बेल’
लॉइज ऑफ लंडन. काही शतके जगाच्या विमाव्यवसायाचे केंद्र समजली जाणारी संस्था. एका मोठ्या दालनात अनेक विमाव्याव-सायिक बसतात आणि कोणत्याही वस्तूचा, क्रियेचा किंवा घटनेचा विमा उतरवून देतात. लॉइड्जची सुरुवात झाली जहाजे आणि त्यांच्यात वाहिला जाणारा माल यांच्या विम्यापासून. ‘मरीन इन्शुअरन्स’ ही संज्ञा आज कोणत्याही वाहनातून केल्या जाणाऱ्या व्यवहाराच्या विम्यासाठी वापरतात. पूर्वी मात्र जहाजी वाहतूकच महत्त्वाची होती आणि लॉइड्जच्या दालनातील बहुतेकांचा प्रत्येक जहाजाच्या प्रत्येक सफरीच्या विम्यात सहभाग असे. एखादे जहाज बुडाल्याची वार्ता आली की दालनाच्या एका कोपऱ्यातील ‘ल्यूटाइन बेल’ (Lutine Bell) वाजवली जाई.
समाजसुधारकांचा वर्ग
प्रत्येक वर्ग तत्त्वे आपल्या वर्गाच्या दृष्टीने किंवा आपल्या विशिष्ट अनुभवाच्या दृष्टीने मांडीत असतो. त्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाची तपासणी करताना तत्त्वे मांडणारांचा वर्ग कोणता होता आणि त्यांची परिस्थिती काय होती याचा नि चय आपणास केला पाहिजे. सामाजिक भावना आणि शासनसंस्था यांचा निकट संबंध असला तरच सामाजिक सुधारणेस प्रवृत्ती होणार आणि कर्तव्यात्मक समाज-शास्त्राची उत्पत्ती होणार. सामाजिक भावना असेल तरच विविध कार्यक्रम लोकांमध्ये उत्पन्न होईल. हिंदुस्थानात १९१९ च्या सुधारणा आल्या तरी समाजाच्या सुखाची आणि संरक्षणाची जबाबदारी घेणारी सामाजिक भावना जन्मास आली नाही. काँग्रेसचे लक्ष ती मवाळ वर्गाच्या ताब्यात होती तोपर्यंत केवळ सिव्हिल सर्व्हिसच्या नोकऱ्या हिंदी लोकांस अधिक मिळाव्यात आणि त्यासाठी त्या नोकरीभरतीच्या परीक्षा हिंदु-स्थानात व्हाव्यात इकडेच होते.
स्त्री: पुरुष प्रमाण
२००१ साली झालेल्या जनगणनेनुसार सर्वच भारतात व विशेषतः काही राज्यांत दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ९२७ इतकी कमी झाली आहे व आणखीच कमी होत चालली आहे. त्यामुळे समाजाचे काही मोठे नुकसान होणार आहे, या कल्पनेने भयभीत होऊन अनेक व्यक्ती धोक्याची घंटा वाजवत आहेत.
समाजातील स्त्रियांची संख्या कमी होणे याचा अर्थ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात स्त्री-हत्या होत आहे. शास्त्र-तंत्रज्ञानातील सुधारणेमुळे स्त्रीहत्येचे स्वरूप अधिकाधिक सोपे, निर्धोक, वेदनारहित व ‘मानवी’ (Humane) बनत आहे. पूर्वीचे स्त्रीहत्येचे प्रकार असे:
(१) नवजात स्त्री अर्भकाला मारणे — उशीने दाबून, पाण्यात/दुधात बुडवून, जास्त अफू घालून, न पाजून, भरपूर मीठ किंवा विष पाजून, थंडीत उघडे ठेवून, कचरा कुंडीत किंवा अन्यत्र टाकून वा अन्य रीतीने.
विक्रम आणि वेताळ
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाची वाट चालू लागला, तेव्हा प्रेतातील वेताळ बोलू लागला:
आटपाट नगर होते, तेथे एक राजा राज्य करत होता. राजा प्रगतिशील होता आणि प्रजेला सुशिक्षित, संपन्न करण्यासाठी झटत होता. परंतु इतक्यात त्याची झोप एका विचित्र प्रश्नामुळे उडाली होती. त्याची प्रजा जरी सुशिक्षित व संपन्न होत चालली होती तरीही प्रजेतील मुलींची संख्या मुलांच्या प्रमाणात न राहता घसरत चालली होती. राजाने निरीक्षण केल्यावर एक भयानक गोष्ट त्याच्या लक्षात आली. मुलींचे आईबापच त्यांच्या जिवावर उठले होते.
कुटुंबकेन्द्रित समाज आणि स्त्री-केन्द्रित कुटुंब (भाग २)
‘स्त्रीकेन्द्रित कुटुंब’ याचा अर्थही स्पष्ट करण्याची गरज आहे. कुटुंब हे किमान द्विकेन्द्री तर असते, व असायलाही हवे. ते बहुकेन्द्री असणे अधिक इष्टही ठरेल. पण ‘स्त्रीकेन्द्री’ असे म्हणण्यामागे, आजचे बिघडलेले संतुलन पुन्हा एकवार दुरुस्त करण्याची गोष्ट प्रधान असावी.
कुटुंबाच्या गाभ्याशी मुले व त्यांचे संगोपन ही गोष्ट आहे. याचाच अर्थ मातृत्व व पितृत्व या दोन्ही भूमिका योग्य रीत्या पार पाडणारे कुटुंब असले पाहिजे. पति-पत्नींचे दांपत्यजीवन त्यांच्या परस्परपोषणासाठी स्वतंत्रपणेही महत्त्वाचे असतेच. पण त्यांच्या पोषणासाठी त्यांना कुटुंबाबाहेर पोचणारे अन्य मैत्रीसंबंध व त्यावर उभारलेले सहजीवन यांचीही तेवढीच आवश्यकता असते.