‘आऊट सायडर’ ही कादंबरी माहीत आहे ना? अल्बेर कामूची ? तिचा नायक मेरसोल. कामूने त्याच्याबद्दल म्हटले आहे, “आजच्या युगाला हवा असेलला तो येशू ख्रिस्त आहे. ” मेरसोल तर एक सामान्य कर्मचारी होता. सामान्याचे आयुष्य जगणारा. बहुधा परवडत नाही म्हणून लग्न न केलेला. त्याच कारणासाठी बहुधा आईला वृद्धाश्रमात ठेवणारा. सिनेमे पाहणे, पोहायला जाणे आणि मैत्रिणीबरोबर भटकणे असे चार-चौघांसारखे आयुष्य जगणारा. तो आजच्या युगाचा येशू कसा?
त्याच्यावर खुनाचा आरोप असतो; तो खराच असतो-मेरसोलही ते नाकारत नाही. त्याला फाशीची शिक्षा होते- मेरसोलची त्याबद्दलही तक्रार नसते; उलट तो म्हणतो, मला फाशी द्याल तेव्हा माझ्या निषेधाच्या घोषणा देणारा जमाव माझ्याभोवती राहील एवढी व्यवस्था करा.