पाकिस्तानातील प्रस्थापितांना वर्षांनुवर्षे एक काल्पनिक इतिहास शिकवला गेला आहे. तरुणांना स्वतःच्या राष्ट्राची महत्ता सांगणारी गुळगुळीत घोषणावाक्ये तपासायला शिकवले जातच नाही. पर्यायी दृष्टिकोन सुचवलेच जात नाहीत. यामुळे कार्ये आणि कारणे यांच्याबद्दल सार्वत्रिक अज्ञान आहे. आणि शिवाय याने ‘काश! वृत्ती रुजते. काश! इंग्रजांनी दक्षिण आशियात हिंदूंची बाजू घेतली नसती, तर!’ किंवा ‘काश. अमेरिकेने आपली वचने पाळून आपल्याला काश्मीर मिळवून दिला असता तर!’ असल्या सुलभीकृत विचारांमुळे विश्लेषणच थांबते.
जोवर पाकिस्तानातील भडकावू घोषणा आणि ‘ब्रेनवॉशिंग’ संस्कृतीची जागा खऱ्याखुऱ्या वैचारिक विविधता येणार नाही, तोवर पाकिस्तान हे आधुनिक, कार्यप्रवण राष्ट्र होणार नाही.