स्फुटलेख

अकारविल्हे रचनेमध्ये ‘अ’ चे स्थान
एकदोन महिन्यांपूर्वी सत्यकथा साहित्यसूची ह्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे झाले. ही सूची श्री. केशव जोशी ह्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक सिद्ध केली आहे. सूची नुसती चाळली तरी त्यांच्या परिश्रमाच्या खुणा जागोजाग दिसतात. सूची सहजिकच अकारानुक्रमाने रचली आहे. आणि येथेच म्हणजे अकारानुक्रमाच्या बाबतीत आजवर एक विवाद्य राहिलेला प्रश्न पुन्हा चर्चेला घ्यावयाचा आहे. तो वर्णमालेमधल्या ‘अ’ ह्या वर्णाबद्दल आहे.
वर्णमालेतल्या अं ह्या अक्षराच्या, नव्हे वर्णाच्या, स्थानाबद्दल कोशकारांचा नेहमीच घोटाळा होत आला आहे. मराठीतले निरनिराळे कोश अं चे स्थान निरनिराळ्या जागी कल्पून रचले गेले आहेत.

पुढे वाचा

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतीचे अर्थ-राजकारण

महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागातील विदर्भात १९९७-९८ या कृषि-वर्षात गेल्या ५० वर्षात न घडलेली अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीची घटना घडली. महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये (मराठवाडा, कोकण) काही प्रमाणात नैसर्गिक कोप घडून आला तरी त्याची वारंवारता, तीव्रता व विस्तार विदर्भात अधिक होता. सुरुवातीला जून आणि जुलै महिन्यांमध्ये तुरळक पाऊस पडल्यानंतर पाऊस सामान्य राहील अशा अपेक्षेने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण जून-जुलै जवळपास कोरडे गेले. पिके उगवलीच नाहीत किंवा वाळून गेली. त्यामुळे ऑगस्टमध्ये दुसऱ्यांदा, काहींना तिसऱ्यांदा, पेरण्या कराव्या लागल्या. पहिल्या पेरणीचा खर्च वाया गेला. पिके उशीरा पेरली तर पीकवाढीच्या प्रक्रियेत प्रत्येक वेळी आवश्यक असलेले अनुकूलतम हवामान मिळत नाही व ऑक्टोबरच्या उन्हाने धरली जाणारी फुले-फळे उत्पादनसंख्या, आकारमान,प्रत व मूल्य ह्या सर्वच बाबतींत गौण (निपजतात व) निपजली.

पुढे वाचा

उपयोगितावादावरील एक आक्षेप

उपयोगितावादाच्या टीकाकारांच्या आक्षेपांपैकी एक आक्षेप असा आहे की सुख ही एकमेव गोष्ट स्वतोमूल्यवान आहे असे उपयोगितावाद्यांचे प्रतिपादन आहे; पण त्यांच्या अनुभववादाशी सुसंगत राहायचे तर ते स्वतोमूल्याची (intrinsic value) कल्पना वापरू शकत नाहीत. कारण स्वतोमूल्याची कल्पना आनुभविक (empirical) कल्पना नाही.
या आक्षेपाला उत्तर देण्यापूर्वी प्रथम स्वतोमूल्य म्हणजे काय ते पाहिले पाहिजे.
प्रथम मूल्य या कल्पनेविषयी. मूल्य म्हणजे अशी गोष्ट की जी आपल्याला हवीशी, महत्त्वाची वाटते, आणि तिच्या प्राप्तीकरिता आपण कष्ट करायला, विविध प्रकारची किंमत द्यायला तयार असतो. उदा. अन्न, वस्त्र, निवारा इत्यादि.

पुढे वाचा

अनीती दुसर्‍यांचे नुकसान करण्यात

लोक अश्लील कशाला म्हणतात ते पाहिले तर असे दिसतें कीं परिचयाच्या गोष्टींना लोक अश्लील मानीत नाहीत. उदाहरणार्थ हिंदुस्थानांत उच्च वर्गातील स्त्रिया स्तन उघडे टाकून रस्त्याने जात नाहीत व बहुतेक ठिकाणीं घरींही उघडे टाकीत नाहीत तथापि हिंदुस्थानांतही कांही ठिकाणी घरीं स्तन उघडे ठेवतात व बाहेर जातांना मात्र वर पातळ आच्छादन असते. जाव्हा बेटांत गेल्यास तेथे ते बाहेर जातांनाही झांकीत नाहीत. अशी उदाहरणे दिसलीं असतां अश्लीलता ही केवळ सांकेतिक कल्पना आहे, यापेक्षा जास्त तथ्य त्यांत नाही, हे समजण्यास मदत होते. त्याचप्रमाणे नीतीची गोष्ट.

पुढे वाचा

संपादक

मासिकाचा प्रकाशक म्हणून अगदी पहिल्यापासून मी त्यांच्याशी संबंध ठेवून असल्यामुळे आणि आता संपादकांनी त्यांची सूत्रे खाली ठेवली असल्यामुळे हे सारे लिहिण्यास प्रवृत्त झालो आहे.)
ह्या अशा प्रकारच्या मासिकाचा खप फार होणार नाही ह्याची संपादक-प्रकाशकांना पुरेशी कल्पना होती. त्याशिवाय ह्या मासिकाच्या जाहिराती जिकडेतिकडे फडकवून वाचकांचे लक्ष त्याकडे वेधून घेणे इष्ट होणार नाही ह्याचीही संपादकांना जाणीव होती. आपल्या मासिकाची कीर्ती ज्यामुळे आपोआप पसरेल असे वर्तन ठेवण्याचे बंधन ह्या मासिकाच्या संपादकांनी आपल्यावर घालून घेतले होते, त्यामुळे काही ठिकाणी नमुना अंक पाठविण्यापलीकडे त्यांनी ह्याच्या प्रचाराचा कोठलाही प्रयत्न केला नाही.

पुढे वाचा

पत्रव्यवहारे

शेरशहा ते अटलबिहारी
जवळ जवळ रोज आपल्याला अशी बातमी वाचायला मिळतेः- “समोरून येणा-या वाहनाला चुकवताना बसगाडी रस्ता सोडून बाजूला गेली व झाडावर आदळली. ड्रायव्हर मृत व इतर ७ अत्यवस्थ.” फरक इतकाच की कधी बस, कधी ट्रक किंवा कधी कार, किंवा रस्ता सोडून बाजूला जाण्याचे कारण बदलते. कधी टायर फुटल्याने, कधी वाहन चालकाला डुलकी लागल्याने, तर कधी चुकार पादचायाला किंवा सायकलस्वाराला वाचवताना गाड़ी रस्त्याबाहेर जाते.
हायवे शेजारी जर मोठे वृक्ष, मजबूत बांधकामे, मोठे मैलाचे दगड अशा गोष्टी नसल्या तर रस्ता सोडून बाजूला गेलेली गाडी शेतातील पिकांमध्ये किंवा माळावरील झुडुपांमध्ये घुसून हळू हळू थांबेल, फार तर उलटी होईल.

पुढे वाचा

स्फुट लेख

एक शहाणा प्रयोग
क) शेतमालाच्या किंमती १९७७ ते १९९८
ज्वारी ‘स्वस्तावली
१९७० १९९८
१०० किलो ज्वारी = १,००० किलो सीमेंट २०० किलो सीमेंट
= २०० किलो लोखंड ४० किलो लोखंड
= ४०० लिटर डीझेल ५० लिटर डीझेल
= ११ ग्रॅम सोने १.५ ग्रॅम सोने
= १,००० किलो ऊस १,००० किलो ऊस
= २० किलो द्राक्षे ५० किलो द्राक्षे
म्हणजे ज्वारी, ऊस यांची किंमत तर घटलीच, पण द्राक्षांची किंमत थेट कोसळली. भाजीपाला दूध यांचेही असेच झाले.
ख) ज्वारी पिकवणारा तगला कसा? घरातल्या बायकापोरांना, गाईबैलांना, जमिनीला, भूगर्भातल्या पाण्याला आणि द्रव्यांना लुटून कारण हे घटक शेतक-यापेक्षाही कमकुवत!

पुढे वाचा

कालचे सुधारक

गुणग्राहक
आदि शंकराचार्यांनी बादरायण व्यासांच्या ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिले. त्या शांकरभाष्यामधले तर्कदोष दाखवून व्यासांतर्फे शंकराचार्यांवर फिर्याद लावणारे केशव लक्ष्मण दप्तरी (१८८०-१९५६) हे एक लोकविलक्षण पुरुष नागपुरात होऊन गेले. हा थोर तत्त्वज्ञ पूर्णतया इहवादी असूनसुद्धा जीवनाच्या ऐहिक बाजूबद्दल अत्यंत उदासीन होता. दप्तरींचे कपडे घालण्याचे काही ठराविक नियम होते. उन्हाळ्यात अमक्या तिथीपासून तमक्या तिथीपर्यंत खादीचा सुती सदरा आणि गांधी टोपी ते घालीत आणि बाकीच्या (हिवाळ्याच्या) दिवसांत घोंगड्याचा उनी सदरा आणि तसल्याच कापडाची काळी टोपी ते वापरीत. मग उन्हाळ्यातल्या किंवा हिवाळ्यातल्या त्या त्या दिवशी हवामान प्रत्यक्षात कितीही थंड किंवा गरम असो.

पुढे वाचा

शतकाचा ताळेबंद

१३ एप्रिल १९९८ चा टाईम साप्ताहिकाचा अंक हा संग्राह्य असा विशेषांक आहे. २० व्या शतकाच्या ह्या संधिकालात गेल्या १०० वर्षांत होऊन गेलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींवर आणि त्यांचा सहभाग असलेल्या महत्त्वाच्या घटनांवर एक प्रकाशझोत टाकून १०० वर्षांच्या इतिहासाचा दस्तऐवज वाचकांसमोर मांडण्याचा टाइमच्या संपादकमंडळाचा विचार आहे. असे एकंदर सहा विशेषांक निघणार आहेत. हा पहिला विशेषांक जगातील प्रभावी राजकीय पुढा-यांवर विशेष भर असलेला आहे. पण त्यात स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या मागरिट सँगर आणि निग्रोंच्या नागरी हक्कांसाठी लढा देणारे मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनि.) यांचाही समावेश आहे.

पुढे वाचा

पुस्तक-परिचय : एकविसाव्या शतकाची तयारी (भाग २)

जागतिक कृषि आणि जैवतंत्रशास्त्र (Bio-technology)
नवीन वैज्ञानिक शोधांनी जागतिक कुपोषणाची समस्या हाताळली जाऊ शकणार नाही काय?
अगदी अलीकडेपर्यंत कृषिउत्पन्न समाधानकारकपणे वाढते आहे असे दिसत होते. १९५० ते १९८४ या काळात शेतीचे उत्पन्न २.६ पटींनी वाढले. ही वाढ जागतिक लोकसंख्यावाढीपेक्षा जास्त होती. लक्षावधि एकर जमीन नव्याने लागवडीखाली आणली गेली, आणि नवीन यंत्रे, अधिक खते, अधिक फलप्रद सिंचन (irrigation) आणि पिकांची फेरपालट यांचा जगभर उपयोग केला गेला.
आशिया खंडात धान्यांच्या नवीन जैवतंत्रशास्त्रीय प्रजननामुळे प्रगतीचे मोठे टप्पे गाठले गेले. संकरज जातींच्या वनस्पती अधिक टिकाऊ असून रोगांचा प्रतिकार अधिक समर्थपणे करू शकतात आणि अधिकृत उत्पन्न देऊ शकतात असे दिसून आले.

पुढे वाचा