‘नवा सुधारका’चा पहिल्या वर्षाचा हा शेवटचा अंक. आज नवा ‘आजचा सुधारक’ एक वर्षाचा झाला. त्याची एक वर्षातील वाटचाल कशी झाली याकडे मागे वळून पाहणे उपयुक्त होईल असे वाटल्यावरून त्यांकडे टाकलेला हा दृष्टिक्षेप.
चोहोबाजूंनी होणाऱ्या अंधश्रद्धा, शब्दप्रामाण्य आणि बुवाबाजी यांच्या आक्रमणापुढे हतबल झालेल्या आपल्या समाजाला जागे करण्याकरिता, आणि त्याला योग्य मार्ग दाखविण्याकरिता आगरकरांनी सुरू केलेले कार्य त्यांच्या अकाली निधनाने अपुरेच राहिले. ते यथाशक्ति पुढे चालविण्याकरिता विवेकवादाचे कंकण बांधलेले हे मासिकपत्र आम्ही काढले आणि गेले सबंध वर्ष ते काम पार पाडण्याचा प्रयत्न केला.