पत्रव्यवहार

ऑगस्ट ९० च्या अंकातील ‘धर्म की धर्मापलीकडे’ हा लेख वाचला. धर्म हा भीतीवर आधारित आहे असे लेखकाने म्हटले आहे. ‘सृष्टीच्या खर्‍याखुर्‍या ज्ञानाने भीतीचा समूळ नाश होणार आहे हे सर्वसामान्य लोकांना पटवून द्यावे लागेल’ असे विधान लेखकाने केले आहे. या विधानाला सबळ पुरावा लेखकाने लेखात कोठेही दिलेला नाही. हे विधान वस्तुस्थितीला धरून आहे असे वाटत नाही. सृष्टीच्या ज्ञानामुळे भीतीचा समूळ नाश होतो ही कल्पनाच चुकीची असल्यामळे ती सर्वसामान्यांना पटवून देता येणार नाही. हृदयरोगाबद्दल संपूर्ण ज्ञान असलेले डॉक्टर्ससुद्धा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर भीतिग्रस्त होतात.

पुढे वाचा

आगरकर म्हणतात –

एकाने दुसर्‍याकरतां सहज मरणें, बुद्ध्या मारून घेणे, किंवा नाहीं नाहीं ते हाल भोगणें हें सर्वथैव इष्ट असेल तर, स्त्री मेल्यावर पुरुषानेही तिच्याबद्दल प्राण सोडणे, प्राणहत्या करणे, किंवा वैधव्यव्रताचे सेवन करणे प्रशस्त होईल, किंवा झाले असते! बायको मेल्याची वार्ता येतांच बेशुद्ध होऊन परलोकवासी झालेल्या भार्यारतांची उदाहरणे कधी तरी आपल्या ऐकण्यांत येतात काय? किंवा स्त्रीबरोबर सहगमन केलेल्या प्रियैकरतांची उदाहरणे कोणत्याही देशाच्या पुराणांत किंवा इतिहासांत कोणीं वाचली आहेत काय ? किंवा बायकोस देवाज्ञा झाल्यामुळे, नित्य भगवी वस्त्रे परिधान करणारे, क्षौराच्या दिवशीं डोक्याच्या किंवा तोंडाच्या कोणत्याही भागावरील केसांची काडीमात्र दयामाया न ठेवणारे, भाजणीच्या थालिपिठाशिवाय दुसन्या कोणत्याही आहारास स्पर्श ने करणारे, अरिष्ट गुदरल्यापासून चारसहा महिने कोणास तोंड न दाखविणारे, पानतंबाखूची किंवा चिलीमविडीची त्या अत्यंत खेदजनक दिवसापासून आमरण समिध शेकणारे, व मंगलकार्यात किंवा कामासाठी घरांतून बाहेर पडणार्‍या इसमापुढे येण्यास भिणारे नवरे कोणी पाहिले आहेत काय?

पुढे वाचा

शंभर वर्षांपूर्वीचे ‘बालविधवेचे गाणे’

बरोबर १०० वर्षांपूर्वी हरिभाऊ आपटे यांनी आपले करमणूक साप्ताहिक सुरू केले. ‘करमणूक’ काढण्याचा उद्देश स्पष्ट करताना हरिभाऊ यांनी म्हटले होते की, ‘केसरी सुधारकादि पत्रे आपल्या कुशल लेखणीने जे काम निबंधाच्या द्वारे करतात तेच काम हे पत्र मनाची करमणूक करून करणार.’ पुढे ते असे म्हणतात की, ‘ज्यांस पुढल्या माडीपासून चुलीपर्यंत व दिवाणखान्यातील टेबलापासून फणीकरंड्याच्या पेटीपर्यंत कोणाच्या हाती पडले तरी, हवे त्याने हवे त्याच्या देखत निःशंकपणे वाचण्यास हरकत नाही असे पत्र पाहिजे असेल त्यांनी अवश्य ‘करमणूक’चे वर्गणीदार व्हावे.’ यातून एक गोष्ट निश्चितपणे जाणवते की ‘चूल’ आणि ‘फणीकरंड्याचा’ उल्लेख करताना त्यांना हे अंक स्त्रियांच्या हाती पडावेत, त्यांनी ते वाचावेत एवढेच नाही तर लिहिण्यास उद्युक्त व्हावे हा त्यांचा स्पष्ट हेतू होता.

पुढे वाचा

सॉक्रेटीसीय संवाद (पूर्वार्ध)

प्रास्ताविक
अनुवादक : प्र. ब. कुळकर्णी

पुढे दिलेला संवाद प्लेटोच्या प्रसिद्ध संवादांपैकी एक आहे. प्लेटोच्या बहुतेक संवादांत प्रमुख पात्र त्याच्या गुरूचे सॉक्रेटिसाचे आहे. सॉक्रेटिसाने स्वतः काही लिहिलेले दिसत नाही. परंतु सबंध आयुष्य त्याने तत्कालीन तत्त्वज्ञ आणि सामान्य माणसे यांच्याशी चर्चा करण्यात व्यतीत केले, आणि या चर्चेतून तत्त्वज्ञानाच्या इतिहासाला एक वेगळे वळण लावले. त्याच्या वादपद्धतीचा एक उत्तम नमुना म्हणून हा संवाद उल्लेखनीय आहे.

सॉक्रेटिसाच्या तत्त्वज्ञानाची आपल्याला जी माहिती आहे तिचे स्रोत दोन, एक प्लेटोने लिहिलेले संवाद, आणि दुसरा झेनोफोन (Xenophon) ने लिहिलेल्या आठवणी.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ६)

कल्पनात्म प्रेम (Romantic Love)
ख्रिस्ती धर्म आणि बर्बर टोळ्या यांच्या विजयानंतर म्हणजे रोमन नागरणाच्या (civilization) पराजयानंतर स्त्री आणि पुरुष यांचे संबंध कित्येक शतकांत गेले नव्हते अशा पशुतेच्या पातळीवर गेले. प्राचीन जग दुराचारी होते, पण ते पाशवी नव्हते. तमोयुगांत धर्म आणि बर्बरता यांनी संगनमत करून जीवनाच्या लैंगिक अंगाचा अधःपात घडवून आणला, विवाहात पत्नीला कसलेच हक्क नव्हते; आणि विवाहाबाहेर सर्वच लैंगिक संबंध पापमय असल्यामुळे अनागरित (uncivilized) पुरुषाच्या स्वाभाविक पशुत्वाला वेसण घालण्याचे कारणच उरले नाही. मध्ययुगात दुराचार सर्व दूर पसरले होते, आणि ते किळसवाणे होते.

पुढे वाचा

विवेकवाद – ६

सत्य, सत् आणि साधु
या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात आपण सत्य म्हणजे काय? या प्रश्नाचा विचार केला. आपण असे म्हणालो की ‘सत्य’ हे विशेषण फक्त विधानांनाच लागू पडू शकते. विधान म्हणजे स्थूलमानाने बोलायचे तर एखाद्या गोष्टीचे वर्णन. वर्णन हे यथार्थ किंवा अयथार्थ असते; म्हणजे वर्य वस्तूचे स्वरूप जसे असेल तसे विधानात सांगितलेले असते, किंवा ते जसे नाही तसे सांगितलेले असते. जेव्हा विधानातील वर्णन यथार्थ असते तेव्हा ते सत्य असते, आणि अयथार्थ असते तेव्हा ते असत्य असते. उदा. ‘पृथ्वी गोल आहे’ हे विधान सत्य आहे, कारण त्यात पृथ्वीच्या आकाराचे वर्णन तो जसा आहे तसे केले आहे; उलट ‘पृथ्वी सपाट आहे हे विधान असत्य आहे कारण त्यात पृथ्वीचा आकार जसा नाही तसा असल्याचे सांगितले आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

[ पुढे दिलेले पत्र आम्ही छापणार नव्हतो. ते क्रोधाच्या भरात लिहिलेले असून त्यातील भाषा असभ्य आणि अभिरुचीहीन आहे, आणि ते वाचून आमच्या वाचकांना क्लेशच होतील याची जाणीव आम्हाला आहे. त्या पत्रात फक्त शिवीगाळ आहे, युक्तिवादाचा मागमूस नाही हे वाचकांच्या लक्षात येईलच. पण तरीसुद्धा ते पत्र छापायचे आम्ही ठरविले यांची दोन कारणे आहेत. एकतर तुम्ही हे पत्र छापणार नाहीच’ असे म्हणून लेखकाने आम्हाला एक प्रकारे आव्हानच दिले होते; ते आम्ही स्वीकारू शकतो हे त्याला दाखवायचे होते. आणि दुसरे म्हणजे मनुष्य सात्त्विक संतापाचा बुरखा पांघरून कोणत्या पातळीवर उतरू शकतो हे आम्हाला वाचकांना दाखवायचे होते, एवढेच नव्हे तर दुष्ट हेतूने डिवचले गेल्यानंतरही त्याला किती सभ्य आणि संयमी भाषेत उत्तर देता येते याचे प्रात्यक्षिकही लेखकाला दाखवायचे होते.

पुढे वाचा

आगरकर म्हणतात –

खरे म्हटले तर चंद्रगुप्तापूर्वीच आमचा राष्ट्रचंद्र मावळला होता. असे म्हणण्यास हरकत नाही. दोन किंवा अडीच हजार वर्षांपूर्वी ज्या प्रकारच्या राज्यविचारांनी, धर्मविचारांनी व सामाजिक विचारांनी आम्ही निगडीत झालो होतो, व त्यावेळी ज्या आचारांचे आम्ही गुलाम होतो तेच विचार आणि तेच आचार अद्यापि आम्हास बहुधा आपल्या कह्यात ठेवीत नाही काय? कोणतीही सचेतन वस्तू बहुधा दोन हजार वर्षे टिकत नाही. पण टिकलीच तर तीत जमीनआस्मानाचे अंतर झाल्याखेरीज राहावयाचे नाही. पण आमच्या शोचनीय राष्ट्रस्थितीत गेल्या दोन हजार वर्षांत म्हणण्यासारखा फेरफार झाला आहे, असे बहुधा कोणाही विचारी पुरुपास म्हणता येणार नाही!

पुढे वाचा

रक्षण की राखण ?

मनूचा पुढील श्लोक प्रसिद्ध आहेः
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।
रक्षन्ति स्थविर पुत्रा न स्त्री स्वातंत्र्यमर्हति ।।

या श्लोकातील पहिले तीन चरण स्त्रीचे रक्षण करण्याचे काम अनुक्रमे तिचा पिता, तिचा पती आणि तिचा पुत्र यांच्याकडे सोपवितात. हे नैसर्गिक आणि न्याय्यही दिसते. स्त्री पुरुषापेक्षा शारीरिक सामर्थ्याने दुर्बल आहे, आणि तसेच तिच्यावर पुरुषाकडून बलात्कार होऊ शकतो, त्यामुळे तिला पुरुषाच्या मदतीची गरज आहे, असे मानणे रास्त आहे. त्यामुळे पहिल्या तीन चरणांबद्दल आक्षेप घेण्यासारखे काही नाही असे म्हणता येईल. परंतु या विचाराशी चौथ्या चरणातील ‘स्त्री स्वातंत्र्याला पात्र नाही’ हा विचार विसंगत दिसतो.

पुढे वाचा

विवेकवाद – ५

या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात ‘आपण कशावर विश्वास ठेवावा?’ अरा प्रश्न आपण विचारला होता, आणि त्याचे उत्तर ‘अर्थात् सत्य विधानांवर’ असे एका वाक्यात दिले होते. परंतु यावर एक आक्षेप असा घेतला जाऊ शकेल की ‘सत्य विधानावर विश्वास ठेवावा’ हे उत्तर पूर्णपणे बरोबर नाही. त्यावर विश्वास ठेवणे नेहमीच इष्ट असेल असे नाही. कित्येकदा सत्यदर्शन अनिष्टही असू शकते. उदा. एखाद्या मनुष्याला जर गंभीर आजार झाला असेल तर पुष्कळदा रोग्याला डॉक्टर ते सांगत नाही. रोगी कदाचित् मानसिक धक्क्याने आणि निराशेने हातपाय गाळील, आणि रोगाला प्रतिकार करण्याची त्याची शक्तीच नाहीशी होऊ शकेल.

पुढे वाचा