भारतीय लोकसंख्या आयोगाचा दुसरा अहवाल नुकताचा मागील आठवड्यात वाचावयास मिळाला. १९९१ च्या जनगणनेतील माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालामध्ये १९८१ ते १९९१ या दशकात जन्मलेल्या बालकांपैकी ६० लाख बालकांचा अभ्यास करण्यात आला असून, जन्मणाऱ्या बालकांत मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात घटत चालल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या घटणाऱ्या संख्येबाबत भारत सरकारनेही गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
आपल्या देशात दर हजार मुलांमागे केवळ ८९१ मुली जन्म घेतात. सुमारे ४० वर्षांपूर्वी, म्हणजे १९४९ ते १९५८ या दशकात, दर हजार मुलांमागे ९४२ मुलींचा जन्म होत होता.