२०१९च्या डिसेंबरच्या शेवटी पहिल्यांदा सापडलेल्या इवल्याशा एका विषाणूने मानवजातीच्या नाकी नऊ आणले आहेत. तो चीन देशातील वुहान प्रांतातील wet market मध्ये कसा सापडला येथपासून ते सोशल डिस्टंसिंग का आणि कसे करायचे ते आता सर्वांनाच माहीत आहे. त्याचप्रमाणे कोणाचे कोणते निर्णय चुकले आणि कोणाचे कोणते आडाखे आणि कोणती भाकीते चुकू शकतात याचीपण आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मी त्याबद्दल फार काही बोलणार नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये मी खगोलशास्त्राच्या डेटाव्यतिरीक्त कॅन्सर आणि इतर वैद्यकीय डेटा याचे ज्ञानात रूपांतर करण्याच्या प्रकल्पांमध्ये सहभागी आहे. साहजिकच या नव्या संकटाशी दोन हात करण्याच्या प्रयत्नांमध्ये खारीचा वाटा उचलायचा माझाही प्रयत्न सुरु झाला.