औपचारिक शाळेची रचनाच नको असा विचार का होऊ नये? पूर्वीची रचना मोडून टाकून नवे अवकाश निर्माण करण्याचा प्रयत्न व्यापक प्रमाणावर का होऊ नये?
गेल्या डिसेंबर महिन्यात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करण्याच्या अनुभवाची आता दोन दशके झाली आहेत. मी नोकरीत वयाच्या २१व्या वर्षीच रूजू झालो. त्यावेळी पहिलीत असणाऱ्या मुलांनी आता २७व्या वर्षात प्रवेश केला असणार. यांपैकी काही जणांची फेसबुकवर नेहमी भेट होत असते. संपर्क होणाऱ्यांपैकी बहुतांश मुले पुण्यात कंपनीत काम करत असल्याची माहिती देतात. सांगायचे हेच की खूप मोठा अधिकारी वर्ग मी घडवला आहे असे अजिबात नाही.