खादी आणि रोजगार यांच्या संबंधाने आपण मागच्या लेखांकात काही चर्चा केली. या अंकात रोजगार आणि पैशाची उपलब्धता यांचा विचार करावयाचा आहे. पैसा आणि रोजगार यांचे संबंध समजून घेण्यासाठी आधी आपण पैसा म्हणजे काय हे तपासून पाहू.
मला स्वतःला पैसा आणि परमेश्वर यांच्यात अत्यंत साम्य जाणवते. आजचा सुधारक च्या वाचकाला परमेश्वर नाही, पण तो आहे असे गृहीत धरून आपले सारे व्यवहार चालतात हे चांगले ठाऊक आहे. पण पैसा देखील मुळात कोठेही नसून तो आहे इतकेच नव्हे तर देवासारखाच सर्वशक्तिमान आहे असे गृहीत धरून चालल्यामुळे आपले आर्थिक व्यवहार होतात हे माहीत आहे की नाही याविषयी शंका वाटते.