पाश्चात्त्य देशांत सतरा-अठराव्या शतकात घडलेल्या राज्यक्रांत्या समता प्रस्थापित करण्यासाठी होत्या, असे त्यांची घोषवाक्ये सांगतात. पण या क्रांत्यांमधून आकार घडलेल्या सर्व समाजांमध्ये काही व्यक्तींचा सत्ता-संपत्तीतील वाटा इतरांपेक्षा खूप जास्त आहे, हे सतत दिसत असते. या विरोधाभासातून उद्भवलेले सामाजिक क्लेश गेली दोनशे वर्षे पाश्चात्त्य देशांमध्ये जाणवत आहेत, विशेषतः उत्तर अमेरिका खंडाच्या राजकीय इतिहासाचा मोठा भाग या अंतर्विरोधाच्या निरसनाभोवती केंद्रित आहे.
याबाबत दोन शक्यता सुचतात – एक अशी, की प्रचंड विषमता हा आपल्या राजकीय – सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे, आणि क्रांत्यांची घोषवाक्ये केवळ जन्माधिष्ठित सत्ता हटवून संपत्त्यधिष्ठित सत्ता प्रस्थापित करण्यापुरतीच होती.