“जर वीज असेल तर लोक दूरदर्शनसंचावरील कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत पाहतील व मग उशिरा झोपल्याने मुले होणार नाहीत” असे आरोग्यमंत्री म्हणाल्याचे वर्तमानपत्रीं वाचले. त्याचबरोबर महेश भट्टांसारखे सिनेमातज्ज्ञ म्हणाले की “उत्तम मनोरंजन हे एक संततिनियमनाचे उत्तम साधन आहे.”
सारांश, लोकसंख्यावाढीचा प्रश्न अजून अस्तित्वात आहे, तो संपलेला नाही, याची जाणीव आजही कोठेतरी आहे व ही वाढ रोखण्यासाठी साधनेही सुचविली जातात हे आजच्या भारतीयांना अभिमानास्पद (?) आहे. नाहीतर भारतात मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यात काम करण्याच्या वयाच्या (१६ ते ५५) लोकांचे प्रमाण त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांच्यापेक्षा बरेच जास्त आहे, ही आर्थिक लाभाची गोष्ट आहे, असे सुचविल्याशिवाय भारतातील कोठलीही बैठक आणि चर्चा पूर्ण होत नसल्याचे ऐकतो.