संघर्ष
संसाधन-वापराच्या वेगवेगळ्या पद्धती वापरणाऱ्या दोन समाजांची गाठ पडली की खूप तणाव उत्पन्न होतो. समाजरचना वेगवेगळ्या असतात. विचारधारा आणि पर्यावरणाकडे पाहण्याची दृष्टी वेगवेगळी असते. इतिहासात वारंवार अशा तणावांमधून तीव्र संघर्ष उपजताना दिसतात. कधीकधी तर वंशविच्छेदापर्यंत मजल जाते. अमेरिकन (रेड) इंडियन्सची संकलकपद्धती जेव्हा यूरोपीय वसाहतवाद्यांच्या शेतकरी-समाजापुढे आली तेव्हा हे घडले. महाभारतातली खांडववन जाळण्याची घटनाही मुळात संकलकांच्या आणि शेतकऱ्यांच्या संघर्षाचेच उदाहरण आहे.
युरोपात औद्योगिक जीवनशैली शेतकऱ्यांशी भिडतानाही हेच घडले. तिथे मोठे वाद उद्भवले ते नव्याने सबळ झालेल्या शासनव्यवस्थेने खेड्यांची सामायिक जमीन बळकावण्यामुळे. आधीच्या शेतकरी जीवनशैलीत चराईची कुरणे, गावसीमेतील वने आणि पाणसाठे गावाच्या सामायिक मालकीचे असत.