Author archives

कोपनहेगेन

युद्ध म्हटलं की आठवतं दुसरे महायुद्ध. अमेरिकेनं जपानवर अणुबॉम्ब टाकला आणि सारं जग ह्या कल्पनातीत संहारानी हादरून गेलं. ह्या प्रकारात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेले शास्त्रज्ञही पूर्णपणे हादरून गेले. अणुबॉम्ब हा जपानवर हल्ला होता, तसाच तो शास्त्रज्ञांच्या सद्सद्विवेकावरही हल्ला होता. कित्येकांनी निर्जीव फिजिक्स सोडलं आणि अधिक सजीव, अधिक मानवी असं जीवशास्त्र जवळ केलं. अणुबॉम्ब बनवण्यात आपण मोठी चूक तर नाही ना केली, अशी टोचणी अनेकांना आयुष्यभर लागून राहिली. तो भीषण आणि क्रूर नरसंहार घडल्यावर अनेकांच्या जगाविषयीच्या, जगण्याविषयीच्या, नीती-अनीतीविषयीच्या संकल्पनांना तडा गेला.

पुढे वाचा

सामाजिक पुनर्रचनेची मूलतत्त्वे: पूर्वार्ध (ग्रंथपरिचय)

श्री. बर्ट्रांड रसेल लिखित ‘The Principles Of Social Reconstruction’ ह्या अल्पाक्षररमणीय ग्रंथाचे प्रचलित अरिष्टामुळे मिळालेल्या फावल्या वेळात वाचन करण्याची संधी मिळाली. कोविड-१९ अरिष्टामुळे संपूर्ण जग अगदी ढवळून निघाले आहे…निघत आहे. कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाचा जागतिक समाजावर (Global society), राष्ट्रांवर, समाजव्यवस्थेवर तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवर अल्पकालीन (Short-run) तसेच दीर्घकालीन (Long-run) होणाऱ्या प्रभावाचे स्वरूप कसे असेल आणि त्या प्रभावाची दिशा काय असेल, एकूणच, एकविसाव्या शतकातील आधुनिक मानवाचे भवितव्य काय आणि कसे असेल? यासंदर्भात जगात सर्वच स्तरांतून चर्चेला आणि आत्मपरीक्षणाला सुरुवात झाली आहे.

श्री. रसेल ह्यांनी ‘प्रिंसिपल्स’चे लिखाण पहिल्या जागतिक महायुद्धाच्या (१९१४-१९१८) पार्श्वभूमीवर केले होते.

पुढे वाचा

सामाजिक पुनर्रचनेची मूलतत्त्वे : उत्तरार्ध (ग्रंथसमीक्षा)

प्रस्तुत लेखाच्या पूर्वार्धात श्री.रसेल ह्यांच्या ‘The Principles of Social Reconstruction’ ह्या ग्रंथाच्या सारांशाविषयी जे विवेचन केले होते, ते मुख्यतः मांडणीप्रधान असून, ग्रंथाची स्थूलमानाने रूपरेषा देणे, एवढ्यापुरतेच ते मर्यादित होते. परंतु मांडणी म्हणजे चिकित्सा नव्हे. त्यामुळे, आता आपण खंडणप्रधान विवेचनाकडे वळूया, ज्यायोगे श्री. रसेलांची नेमकी भूमिका वाचकांसमोर येईल, अशी आशा आहे. परंतु जेव्हा आपण चिकित्सा म्हणतो, तेव्हा तिला काही मर्यादा घालणे हितकारक ठरत असते. म्हणून या समीक्षेची मर्यादा हीच की यामध्ये आपण प्रस्तुत ग्रंथांतील ‘मालमत्ता’ (Property) या प्रकरणाचीच विशेषतः दखल घेणार आहोत.

पुढे वाचा

बर्बादीचा माहामार्ग

{प्रस्तुत फोटो हे आभासी तथा इंन्स्टाग्राम/गुगलवरून घेतलेले नसून आमच्या शेत-शिवारातले जिवंत फोटो आहेत.}

स्वातंत्र्याच्या पाऊणशे वर्षांनंतरही…
वावरात हातभर लांबीच्या बंडीभर काकड्या,
नारळाएवढाले सीताफळं निरानाम सडू घातलेले.
पान्यामुळं बाबडलेला मुंग, वांझोटा भुईमुंग,
काळंवडलेल्या तीळाची मती गुंग
घरी आनाचं कसं एकाएकी गर्भपात झालेलं सुयाबीन ?

वावराजौळचे असे  दूरदूर चिखलप्रेस समृद्ध हायवे
ऐन हंगामावर अभाळाले हैजा झालेला
रस्त्यानं आपलाच जीव आपल्याले भारी
कुठून इथं जल्म घेतला इच्यामारी !

खालून चिक्कट चिखलगाळ
अन् वरतून ओरबाडणाऱ्या चिल्हाट्या-बोराट्या!
चालता चालताच जातेत सरनावर तुऱ्हाट्या.

बैलबंड्या फसतेत,
वाटसरू घसरून मोडतेत
कोनाचा हेंगडते पाय
कुठं नुसतीच रुतून बसते पान्हावली गाय
अवंदा दुरूस्तीसाठी कास्तकारांजवळ  नाई दमडं
ज्याच्याजौळ लुगडं, थेच पडलं उघडं !!

पुढे वाचा

धर्म आणि विज्ञानाची सांगड = सुखी मानवी जीवन

धर्म, मग तो कोणताही असो, त्याची चिकित्सा करायची नसते, त्यावर शंका घ्यायची नसते असेच संस्कार बालपणापासून प्रत्येकावर झालेले असतात. त्या संस्कारांचा पगडा एवढा जबरदस्त असतो की व्यक्ती कितीही शिक्षण घेऊन मोठी शास्त्रज्ञ झाली, आयएएस झाली तरी, धर्माची चिकित्सा करण्याचा विचारसुद्धा तिच्या मनाला शिवत नाही. कारण धर्म हा माणसापेक्षा मोठा, धर्मापेक्षा महत्त्वाचे काहीच नाही हीच शिकवण आपल्याला देण्यात येते. शालेय अभ्यासक्रमातसुद्धा जुने जे धर्मचिकित्सक होऊन गेले त्यांच्याबद्दल माहिती दिली जात नाही. पण आता विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करण्याची सवय लावली पाहिजे. मग तो धर्म असो की विज्ञान.

पुढे वाचा

त्या कृष्णसागरावरती

त्या कृष्णसागरावरती
विश्वाच्या लाटा येती
गंगांचे फेस उधळती
बुडबुडे ग्रहांचे उठती |

त्यातील नील गोलाला
म्हणतात आपली धरती
धरणीच्या पायघड्यांतून
या पर्वतमाला घडती |

अन् सप्तसमुद्रांवरती
जलदांच्या राशी झुलती
वाऱ्यावर लहरत जाता
अचलांवर करती वृष्टी |

की हरित जटा शंभूच्या
वृक्षावली दाट उगवती
फेसाळत उंच कड्यांतून
ओघांच्या सरिता बनती |

वेळूवनातून जाता
वाऱ्याची गीते होती
पकडून सूर्यकिरणाांना
जलबिंदू रंग पसरती |

जलचर वनचर पक्षी
अन् मानव रांगत येती
ते उभे राहती आता
भाषेची कळते युक्ती |

जे दिसे जाणवे ते ते
जाणिवेपार जे लपले
कल्पना विहंगम होता
ते ऋचा अर्पुनी गेले |

वनकुहरे सोडून केली
सरितातीरावर वस्ती
जोडिली, उराशी जपली
ती स्थावर, जंगम, नाती |

वडवानल होते उर्जा
बेटांची कमळे फुलती
कधी त्सुनामी होऊन लाटा
भातुकली मोडून जाती |

शावके, फुले अन् बाळे
हास्याची उधळण करती
काळाचे हस्तक केव्हा
सुह्रदांना ओढून नेती |

हे चलनवलन सृष्टीचे
शाश्वती एक बदलाची
बुडबुडे, फेस अन् लाटा
कृष्णातच विरती स्फुरती |

मज हव्यात लाटा
नीलबिलोरी
वेळावत, फुस्कारत, धसमुसणाऱ्या,
अन् तरंग अस्फुट लव पाण्यावर
लवलवणारी |

मज हवा फेस तो
लाटांवर फसफसणारा
मज हवे बुडबुडे, घुमट जणू काचेचे
जे गिरकी घेता, रंगांचे नर्तन होते |

घुमटात सखे त्या
हाती गुंफू हात
या क्षणात लपला
आहे काळ अनंत |

विक्रम आणि वेताळ – भाग ५

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.

“राजन्, गेल्या खेपेत, आपल्याला आपल्या कल्पनासाम्राज्यात वास्तवाची किंवा तर्कबुद्धीची बोच कशी नकोशी वाटते आणि सभोवतालचं वास्तव जितकं जास्त कटू/दुस्सह असेल तितकं आपल्याला आपल्या काल्पनिकविश्वाचं आकर्षण कसं जास्त असतं, हे जे तू सांगितलंस ते तर अगदी खरं आहे. करमणुकीच्या किंवा मनोरंजनाच्या क्षेत्रात तर हा अनुभव नेहमीच येतो. आपल्याकडे बहुसंख्य लोकांना कोणते चित्रपट आवडतात ते बघ. ज्या चित्रपटात निव्वळ कल्पनारंजन असेल, वास्तवाला किंवा तर्काला थारा नसेल, असेच ‘दे मार’ चित्रपट लोकप्रिय होतात.

पुढे वाचा

अंत्यसंस्कार

पुरातत्त्ववेत्त्यांनी शोधलेल्या खूप जुन्या काळातल्या सामुदायिक दफनभूमी पाहता, अग्नीचा शोध लागायच्या आधी सर्व खंडांतील, सर्व प्रकारच्या मानव समुदायांनी मृतदेहांना एखाद्या झाडाखाली, गुहेमध्ये अथवा विवरामध्ये ठेवले असेल. पालापाचोळा आणि फारतर काही फांद्या इत्यादींनी ते मृतदेह झाकले असतील. कारण ‘खोल खोदणे’ हेसुद्धा मानवाच्या त्या आदिम अवस्थेमध्ये, अवजारांच्या अभावी सहज शक्य नसणार. बहुसंख्य ठिकाणी आपापल्या टोळीची जिथे जिथे जागा असेल, त्या जागांवर ते मृतदेह ठेवले जात असतील, कारण बऱ्याच ठिकाणी दगडांच्या मोठ्या वर्तुळात सांगाडे पहावयास मिळाले.

मृतदेहांची विल्हेवाट लावणे हे काम निसर्गाने विविध प्राण्यांना दिलेले आहे.

पुढे वाचा

कविता – कालची व आजची

कविता आजची असो अथवा कालची, तिच्या निर्मितीमागील प्रेरणा मानव्य असते. तिला स्थलकालाचे बंधन नसते. साहित्य निर्मितीमागील प्रेरणा ही सर्वसामान्यपणे प्रत्येक देशात व भाषेत सारखीच असते. साहित्याची निर्मिती होण्यासाठी एक फार मोठी शक्ती आवश्यक असते. ती म्हणजे “प्रतिभा”! वामनाने यालाच ‘कवित्वाचे बीज’ असे म्हटले आहे. त्यासोबतच स्फूर्ती व कल्पनाशक्तीही महत्त्वाची असते. प्लेटो व अरिस्टॉटलने कलात्मक अनुकरणाचा (Artistic Imitation) सिद्धांत मांडलेला आहे. त्यांच्या मतानुसार अनुकरणाच्या माध्यमातून काव्याची निर्मिती होत असते. विल्यम वर्डस्वर्थने काव्य-स्फूर्तीची व्याख्या ”उत्कट भावनांचा सहज उत्स्फूर्त उद्रेक” अशी केलेली आहे. Prescott च्या मतानुसार प्रतिभा घडविणारी शक्ती म्हणजे ”कल्पनाशक्ती”.

पुढे वाचा

पटरी

मुंबई.

घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करणारं, ऐन रात्रीतही टक्क जागं राहत कधीच न झोपणारं शहर. स्वत:चं हे वेगळेपण जपण्यासाठीच का माहीत नाही, नेहमीप्रमाणं आजही ते झोपलं नव्हतं. याच जागरणं करणाऱ्या मुंबईतला सेंट्रल गव्हर्नमेंट हाऊसिंग कॉलनीमुळे सुप्रसिद्ध असलेला अँटॉप हिल विभाग. त्यालाच खेटून असलेली बांडगुळासारखी वाढत गेलेली कुप्रसिद्ध समजली जाणारी अँटॉप हिल झोपडपट्टी. रात्रीच्या म्हणा किंवा मग पहाटेच्या म्हणा तीनच्या ठोक्याला तिथल्या दोन खोल्यांतून अनुक्रमे मंदा केडगे आणि नाझिया खान या दोघी बाहेर पडल्या. मंदाच्या एका हातात मोबाईल तर दुसऱ्या हातात पाण्यानं भरलेलं टमरेल.

पुढे वाचा