विवाह
या प्रकरणात मी विवाहाची चर्चा केवळ स्त्रीपुरुषांमधील संबंध या दृष्टीने, म्हणजे अपत्यांचा विचार न करता, करणार आहे. विवाह ही कायदासंमत संस्था आहे हा विवाह आणि अन्य लैंगिक संबंध यांतील भेद आहे. विवाह ही बहुतेक सर्व देशांत एक धार्मिक संस्थाही असते, पण ती कायदेशीर आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. आदिम मानवांतच केवळ नव्हे तर वानरांत आणि अन्यही अनेक प्राणिजातीत प्रचलित असलेल्या व्यवहाराचे विवाह ही कायदेशीर संस्था एक रूप आहे. जिथे अपत्यसंगोपनात नराचे सहकार्य आवश्यक असते तिथे प्राण्यांतही विवाहसदृश व्यवहार आढळतो. सामान्यपणे प्राण्यांमधील ‘विवाह’ एकपत्नीक-एकपतिक असे असतात, आणि काही अधिकारी अभ्यासकांच्या मते मानवसदृश वानरांमध्ये (anthropoid apes) ते विशेषत्वाने आढळतात.