दोन वर्षांच्या काळातच पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या व दुसर्यांदा त्रिशंकू संसद अस्तित्वात आली. कोणत्याही एका राष्ट्रीय पक्षाला बहुमत मिळाले नाही. अनेक प्रादेशिक पक्षांचे उमेदवार निवडून आले. त्यातून निर्माण झालेली परिस्थिती अशी आहे की या प्रादेशिक पक्षांची मदत घेतल्याशिवाय कोणत्याही एका राष्ट्रीय पक्षाला सत्तेवर येणे कठीण झाले आहे. राष्ट्रीय पक्षाचे सरकार किती दिवस टिकवायचे हे आता प्रादेशिक पक्ष ठरवणार अशी अभूतपूर्व स्थिती आज निर्माण झाली आहे व हेच ताज्या लोकसभा निवडणुकांचे प्रधान वैशिष्ट्य आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
धर्म व जात यांच्या आधारे निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात होऊ लागला होता.