वास्तव देवकल्पना
एकटा देवधर्म घेतला आणि त्याकडे पाहू गेले तर, कातकरी पिशाचपूजक होता, यहुदी, मुसलमान व ख्रिस्ती मनुष्याकार एकदेवपूजक होते, पारशी अग्निपूजक ऊर्फ पंचभूतांपैकी एका भूताचा पूजक होता, आणि हिंदू पशुपक्षिमनुष्याकार अनेकदेवपूजक असून शिवाय अग्न्यादिपंचभूते, पिशाच्चे, एकदेव, झाडे व दगड, ह्यांचा भक्त होता, इतकेच नव्हे तर स्वतःच देव, ईश्वर व ब्रह्मही होता. देव एक हे जितके खरे तितकेच ते कोट्यवधी आहेत हेही खरे असल्यामुळे, म्हणजे दोन्ही कल्पना केवळ बागुलबोवाप्रमाणे असत्य असल्यामुळे, कातकरी, यहुदी, मुसलमान, पारशी, ख्रिस्ती व हिंदू हे सारेच अनेक निराधार व अवास्तव कल्पनांच्या पाठीमागे धावत होते व आपापल्या कल्पनांचा अनिवार उपभोग घेण्यात सौख्य मानीत होते.
पत्रव्यवहार
पत्रव्यवहार
संपादक, आजचा सुधारक स.न.वि.वि.
तमचा “धर्मनिरपेक्षता” अंक मिळाला. त्यात अनेक व्यासंगी विद्वानांचे लेख आले आहेत. त्यात डावे उजवे आहेत. तरी त्यांच्यांत आगरकर यांचा बुद्धिप्रामाण्यवाद गोमारोमातून भिनलेला दिसत नाही. कारण ते सर्वजण हिंदूंच्या सहिष्णुतेची अपरंपार स्तुती करताना दिसतात.
वास्तविकरीत्या जगाच्या इतिहासावरून हे स्पष्ट होते की जेते अत्याचार करतात आणि हिंदु जेते कधीच नव्हते. नवराबायको या जोडीमध्येसुद्धा हुशार जो असतो किंवा अर्थार्जन करतो तो दुसऱ्यावर कुरघोडी करतो, स्त्रियांनी पुरुषावर केलेल्या कुरघोडीची अनेक उदाहरणे आहेत.
पुराणकाळी खांडववन जाळणे किंवा नागांची हत्या करणे अशा अनेक गोष्टी जेत्यांनी केलेल्या आहेत.
सेक्युलॅरिझम आणि भारत – लेखांक पहिला
एप्रिल १९९१ च्या ‘आजचा सुधारक’च्या अंकात ‘धर्मनिरपेक्षता : काही प्रश्न‘ या विषयावरील परिसंवादासाठी काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्या संदर्भात प्रस्तुत लेख लिहीत आहे. प्रश्नावलीतील मुद्द्यांना तुटक तुटक उत्तरे देण्याऐवजी सेक्युलॅरिझम या संकल्पनेचा उद्गम कोणत्या परिस्थितीत झाला, या संकल्पनेचा मध्यवर्ती आशय कोणता, ही संकल्पना कोणत्या मागनि विकसित होत गेली आणि मुख्यतः भारतात तिला कोणते स्वरूप आले. भारतातील धार्मिक संघर्षाची समस्या सोडविण्यात ही संकल्पना पूर्णपणे यशस्वी का होऊ शकली नाही, सेक्युलॅरिझम ही संकल्पनाच येथील परिस्थितीच्या संदर्भात सदोष आहे की शासन आणि विविध राजकीय पक्ष यांच्या चुकीच्या धोरणामुळे सेक्युलॅरिझमची यशस्वी अंमलबजावणी होऊ शकली नाही यासारख्या प्रश्नांची चर्चा केल्यास प्रश्नावलीतील बहुतेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.
विवाह आणि नीती (भाग १६)
लोकसंख्या
‘विवाहाचे प्रमुख प्रयोजन म्हणजे पृथ्वीवरली मानवाची संख्या भरून काढणे, काही विवाहव्यवस्थांत हे प्रयोजन अपुऱ्या प्रमाणात साधले जाते, तर काही जास्तच प्रमाणात ते पुरे करतात. या प्रकरणात मी लैंगिक नीतीचा विचार या दृष्टिकोणातून करणार आहे.
व नैसर्गिक अवस्थेत मोठ्या सस्तन प्राण्यांना जिवंत राहण्याकरिता दरडोई बराच मोठा भूभाग लागतो. त्यामुळे मोठ्या सस्तन प्राण्यांच्या कोणत्याही जातीत प्राणिसंख्या अल्प असते. मेंढ्या आणि गाई यांची संख्या बरीच मोठी आहे; पण त्याचे कारण मनुष्याचे कर्तृत्व. मनुष्याची संख्या अन्य कोणत्याही मोठ्या प्राण्यांच्या तुलनेने प्रमाणापेक्षा फारच जास्त आहे.
विवेकवाद – १८
नैतिक मूल्यांविषयी आणखी थोडेसे
आजचा सुधारक च्या नोव्हेंबर १९९१ च्या अंकात नागपूर येथे भरलेल्या एका वाचक मेळाव्याचा वृत्तांत आला आहे. त्यात झालेल्या चर्चेचे संचालन आमचे मित्र प्रा. अ.ना. लोथे यांनी केले. त्यांनी प्रारंभीच काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्या अनुषंगाने चर्चा व्हावी असे सुचविले. वेळेच्या अभावी त्यांपैकी काही प्रश्नांना मी संक्षेपाने उत्तरे दिली, परंतु त्यांचा पुरेसा विस्तार मला करता आला नाही, प्रा. लोथे यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे असल्यामुळे, आणि ते अन्यही अनेकांच्या मनात उपस्थित झालेले असणार असे वाटल्यावरून त्यांची काहीशी सविस्तर चर्चा करण्याचे येथे योजले आहे.
आजचा सुधारकः वाचक मेळावा
‘आजचा सुधारक एक वर्षाचा झाला तेव्हापासून एखादा वाचक मेळावा घ्यायचे वाटत होते. नागपूरच्या वसंतराव नाईक कला व समाजविज्ञान संस्थेच्या (जुने मॉरिस कॉलेज) राज्यशास्त्रविभागाच्या पुढाकाराने ती कल्पना साकार झाली, “धर्मनिरपेक्षता, विवेकवाद आणि आजचे सुधारक’ या विषयावर एक परिचर्चा उपर्युक्त संस्थेचे राज्यशास्त्रविभागप्रमुख प्रा. कवठाळकर यांनी १४ सप्टेबर १९९१ रोजी घडवून आणली. या चर्चेसाठी शहरातील विविध क्षेत्रांशी संबंधित विचारवंत, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक, धर्मशास्त्राचे अभ्यासक, व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आमंत्रित केले होते. योगायोगाने प्रसिद्ध विचारवंत श्री. वसंत पळशीकर नागपुरात मुक्कामाला होते. त्यांच्याही उपस्थितीचा आम्ही लाभ घेतला.
गोर्बाचेव्ह
मिखाएल गोर्बाचेव्ह यांची सत्ता सोवियत संघाच्या जनतेने त्यांना पुनः बहाल केली. हजारो लोकांनी रणगाड्यांना तोंड देत, आपले प्राण पणाला लावून नवजात स्वातंत्र्याचे रक्षण केले. बंड करणाऱ्या पुराणपंथी लोकांचा पराभव झाला आणि जी क्रांती गोर्बाचेव्ह यांनी १९८५ साली सुरू केली होती. त्या क्रांतीतून निर्माण झालेल्या सामाजिक शाक्तींनी गोर्बाचेव्ह यांना पुनः परत सत्तेवर आणले. १० मे १९८९ पासून रुमानिया, पूर्व जर्मनी, झेकोस्लाव्हाकिया या देशातील जनतेने “जनतेच्या लोकशाह्या” उद्ध्वस्त केल्या. फक्त मे १९८९ मधील चीनच्या जनतेचे बंड अयशस्वी ठरले. कारण चीनच्या ‘जनमुक्तिसैन्याने कट्टरपंथी लोकांना साथ देऊन हजारो तरुण विद्यार्थ्यांचे शिरकाण केले.
१९८९ : एक अन्वयार्थ
मूळ लेखक : पॉल एम्. स्वीझी
एका युगाचा प्रारंभ किंवा शेवट म्हणून, महत्त्वाचे वळण देणारी म्हणून, विशिष्ट वर्षे ही लक्षणीय टप्पे म्हणून इतिहासात नोंदली जातात. १७७६, १७८९, १८४८, १९१७, १९३९ ही अशी काही वर्षे होती. ह्या यादीत जाऊन बसणारे आणखी एक वर्ष म्हणजे १९८९ (एकोणीसशे एकोणनव्वद) हे होय. पण कशासाठी म्हणून ते विशेष लक्षात राहील? Js_ कम्युनिझमचा शेवट झाला यासाठी, असे काही म्हणतील; तर इतर काही, भांडवलशाही आणि समाजवाद यातील संघर्षात भांडवलशाहीचाच अखेर विजय झाला यासाठी, असे म्हणतील. पण मला एक वेगळाच अन्वयार्थ सुचवावासा वाटतो.
धर्म, धर्मकारण, धर्मनिरपेक्षता इत्यादि
गेल्या पाचपन्नास वर्षांत ह्या देशांत अनेक गोष्टींचे वाटोळे करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. अर्थात् हे कर्तृत्वही परंपरेतून आले असावे. पिढ्यानपिढ्या आपण हे करीत आलो असलो पाहिजे. नाट्यशास्त्रात एके ठिकाणी जगांत अनेक वर्षे (म्हणजे देश) आहेत, पण एकट्या भारतवर्षांत दुःख आहे; म्हणून तिथे नाटक करायला हवे; असे म्हटले गेले .
त्यावरून आजकाल जे घडते आहे त्यासंबंधी फार आश्चर्य वाटायला नको. पण हा विनोदाचा भाग झाला. तो घटकाभर बाजूला ठेवू. स्थूलमानाने बोलायचे तर इतर फळ्यांप्रमाणे धर्मनिरपेक्षतेच्या फळीवरही आपण अयशस्वी ठरलो आहोत असे म्हणता येईल.
विवेकवाद -१७
गीतेतील नीतिशास्त्र – (उत्तरार्ध)
या लेखाच्या पूर्वार्धात गीतेत जी नीतिमीमांसा आलेली आहे तिचा माझ्या मते यथार्थ अनुवाद मी दिला आहे. आता उत्तरार्धात त्या मीमांसेचे विवेकवादी भूमिकेवरून परीक्षण करावयाचे आहे.
गीतेतील मोक्षशास्त्र खरे आहे काय?
पूर्वार्धात आपण पाहिले की गीतेतील नीतिमीमांसा मोक्षशास्त्रावर आधारली आहे. त्या मोक्षशास्त्राच्या आधारावाचून गीतेतील नीतिमीमांसेला प्रतिष्ठा नाही. म्हणून तिच्यात अभिप्रेत असलेले मोक्षशास्त्र यथार्थ आहे काय? या प्रश्नाचे उत्तर आपण प्रथम द्यायला हवे.
स्थलाभावी या प्रश्नाचा परामर्श येथे काहीशा संक्षेपानेच घेता येईल. या चर्चेवर दुसरेही एक बंधन आहे. ते असे की हा लेख केवळ तज्ज्ञ, विशेषज्ञ किंवा तत्त्वज्ञ यांनाच फक्त कळेल असा होता कामा नये, साधारण सुशिक्षित अशा सामान्य वाचकालाही तो कळेल असे त्यातील विवेचन असावे असा आमचा प्रयत्न असतो.