२२ फेब्रुवारी २००२ ला करसेवकांचा एक जथा साबरमती एक्स्प्रेसने अमदावादहून अयोध्येला गेला व २६-२७ फेब्रुवारीला परतला. दोन्ही प्रवास होत असताना जागोजागी करसेवकांनी इतर प्रवासी, स्थानकांवरील विक्रेते वगैरेंशी गैरवर्तन केले. विशेषतः मुस्लिमांशी हे वर्तन नारेबाजी व अरेरावीच्या बरेच पलिकडचे होते. फैजाबादच्या २५ फेब्रुवारीच्या वृत्तपत्रात अयोध्येकडील प्रवासातील गैरव्यवहाराची नोंदही झाली.
२७ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ला गोध्रा स्थानकावर मुस्लिम स्त्रिया व विक्रेत्यांशी करसेवकांच्या दुर्वर्तनाच्या अनेक घटना घडल्या. गाडी सुटली व एखादा किलोमीटर जाऊन थांबली—-का थांबली हे कळलेले नाही. चालकाने बाहेरून एक जमाव गाडीवर गोटमार करताना पाहिला, पण ही गोटमार एस-६ डब्यावर होत नव्हती.