संपादक, आजचा सुधारक यांस.
आपण गीतेतील चातुर्वर्ण्य जन्माधारितच होते असे प्रतिपादन ‘आजचा सुधारक मधील विवेकवाद या लेखमालेतून केले आहे. (अशाच प्रकारचे प्रतिपादन मीही माझ्या ‘विषमतेचा पुरस्कर्ता मनू’ या पुस्तकाच्या भूमिकेत १९८३ मध्ये केले होते.) आपल्या या प्रतिपादनावर ‘आजचा सुधारक’च्या ताज्या अंकात सुधाकर देशपांडे यांची प्रतिक्रिया आली आहे. तथापि आपलीच भूमिका मला का पटते यासाठी समर्थनाचे काही मुद्दे देत आहे.
(१) गुणकर्मविभागश: मी चातुर्वर्ण्यव्यवस्था निर्माण केली आहे असे सांगताना स्वतःला ईश्वर म्हणविणाऱ्या श्रीकृष्णाने चातुर्वर्ण्यव्यवस्थेचे कर्तृत्व स्वतःकडे घेतले आहे. गुणानुसारच माणसांचे कर्म ठरवायचे असेल तर त्यासाठी अशा “ईश्वरनिर्मित व्यवस्थेची गरज नव्हती.