गीतेतील नीतिशास्त्र – आक्षेपांना उत्तरे
‘गीतेतील नीतिशास्त्र’ या माझ्या लेखावर आमचे अनेक मित्र नाराज झाले आहेत. त्यांपैकी प्रा. सुधाकर देशपांडे आणि प्रा. देवदत्त दाभोलकर यांची पत्रे जानेवारी १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाली असून प्रा. श्री. गो. काशीकर यांचा लेख या अंकात अन्यत्र छापला आहे. प्रा. सुधाकर देशपांडे यांनी माझ्यावर सत्यशोधकाचा नि:पक्षपातीपणा सोडून वकिली बाणा स्वीकारल्याचा आरोप केला आहे, प्रा. काशीकर यांनी हे विवेचन विवेकवादी नव्हे असा सरळ निर्णय दिला आहे; आणि प्रा. दाभोलकर यांनी मला विनोबा भाव्यांचे ‘स्थितप्रज्ञदर्शन’ हे पुस्तक वाचण्याची आणि त्याला त्याच तोलाचे उत्तर देण्याची शिक्षा फर्मावली आहे.