‘बाबा, एक फ्रेंड येणार आहे. आम्हाला काही discuss करायचे आहे.’ मुलाचा फोन.
माझा मुलगा ‘टीन’ वयोगटातला.
‘हो. येऊ दे की.’ मी.
बेल वाजल्यावर दरवाजा उघडला. समोर माझा मुलगा आणि एक मुलगी. मुलगी असणं मला अनपेक्षित होतं. फ्रेंड म्हणजे मुलगाच असणार असं मी गृहीत धरलं होतं. का? – माझा समज. संस्कार. मुलाचा मित्र मुलगाच असणार. जास्तीकरून समाजात असंच असतं ना. आमच्यावेळी तर हे असंच अधिक होतं. शिवाय त्याने लिंगनिरपेक्ष फ्रेंड शब्द वापरला होता. मैत्रीण असे म्हटले असते, तर प्रश्नच नव्हता. मी काही जुन्या विचारांचा नाही.