१ आजचा सुधारकच्या विचारभिन्नता विशेषांक वाचला. अंकातील लेख चांगले असले आणि गूगलवर शोधून इंग्रजीत मिळणाऱ्या माहितीचे मराठीतून केलेले संकलन म्हणून महत्वाचेही असले तरी समकालीन भारतीय परिप्रेक्ष्यात मुळातून नवा (किंवा स्वतंत्र – स्वतःचा) विचार त्यात कशातच आला नाहीये (शिवाय भविष्याचा वेध घेणारं लेखनही अंकात नाही) त्यामुळे खरं सांगायचं तर किंचित निराशा (नि अपेक्षाभंग) झाला. मी जेव्हा म्हणतो की समकालीन भारतीय परिप्रेक्ष्यात मुळातून नवा (किंवा स्वतंत्र – स्वतःचा) विचार त्यात कशातच आला नाहीये, तेव्हा मला बरंच काही म्हणायचंय. आधी एक स्पष्ट करतो की यातील बहुतांश लेख ‘महत्त्वाचे’ आहेत.
संपादकीय
‘आजचा सुधारक’चा ‘विचारभिन्नता विशेषांक’ वाचकांसमोर ठेवताना आम्हांला आनंद होतो आहे. तात्त्विक दृष्टिकोनापासून ते रोजच्या जगण्यापर्यंत आपल्याला विचारभिन्नतेला सामोरं जावंच लागतं. या भिन्नतेला बरोबर घेऊनच आपण आपल्या जगण्याची चौकट आखत असतो. विशेषतः राजकीय-सामाजिक संदर्भात प्रामुख्याने भारतीय समाजाचा विचार करत असताना आज जे चित्र समोर दिसत आहे त्यावर साधक-बाधक चर्चा करण्यासाठी एक विशेषांक काढावा अशी कल्पना पुढे आली आणि सगळ्यांनीच ती उचलून धरली.
माणूस आणि सृष्टी हे नातं जसं द्वंद्वात्मक आहे, तसंच माणूस आणि माणूस हेही नातं द्वंद्वात्मक आहे. माणसाची वाटचाल एकरेषीय नाही आणि त्यामुळे त्याच्या विचारांची वाटचालही एकरेषीय नाही.
मनोगत
ज्या माणसाला म.गांधींच्याविषयी अतीव श्रद्धा आणि आदर आहे त्या माणसाने गोळवलकर गुरुजी आणि सावरकर यांच्याहीविषयी आपल्या मनात अत्यंत आदर आहे, हे सांगणेच आपल्याला प्रथमत: पटत नाही. कारण आपण मनातल्या मनात दोन गोष्टींची सांगड घालून टाकलेली आहे. एखाद्या व्यक्तीविषयी मनात आदर असणे आणि त्या व्यक्तींची मते, निदान प्रमुख मते अजिबात मान्य नसणे या दोन गोष्टी एकत्र संभवतात, हेच आपण विसरून गेलेलो आहोत. वर्तमानकाळातील लोकांना ज्या व्यक्ती परस्परांच्या विरोधी उभ्या राहिलेल्या दिसतील, त्या व्यक्ती खरोखरीच भविष्यकाळातल्या मंडळींना एकमेकांच्या विरोधी वाटतील असे नाही. लो.टिळक
बंडखोरीची पाश्चिमात्त्य परंपरा
परंपरा आणि नवता हा संघर्ष तीव्र होतानाच्या युरोपमधील विविध घडामोडींचा, तिथल्या `बंडखोरांच्या कारवायांचा’ हा अभ्यासपूर्ण आलेख.
—————————————————————————-
‘परंपरा’ या शब्दाला आपल्याकडे खूप वजनदार संदर्भ असतात. ‘महान’, ‘समृद्ध’ अशी जी विशेषणं अनेकदा त्याला जोडून येतात,त्यांच्यामुळे हे वजन वाढत जातं आणि अखेर परंपरेचं जोखड बनतंय की काय,असं वाटू लागतं. अनेकविध परंपरांच्या सरमिसळीतून घडलेल्या आपल्या संस्कृतीच्या इतिहासात ज्या परंपरांचं असं ओझं होणार नाही अशा काही खोडकर परंपरा कदाचित असतीलही;पण त्यांची आठवण करून दिली तर ‘त्या फार महत्त्वाच्या नव्हत्या’ ,किंबहुना ‘त्या नव्हत्याच’ असं म्हणून त्यांना नाकारण्याची प्रवृत्ती (किंवा परंपरा) आपल्याकडच्या परंपरांचे पाईक म्हणवणाऱ्यांमध्ये दिसून येईल.
सहमती, असहमती आणि वादविवाद
वादविवादांचा उद्देश काय असावा? प्रतिस्पर्ध्याला ‘पराजित’ करणे की आपल्या व त्याच्या आकलनात भर घालणे? वाद-विवादाच्या प्रचलित स्वरूपावर प्रश्नचिन्ह उभे करणारा हा लेख.
—————————————————————————–
अमर्त्य सेन यांचे Argumentative Indian हेपुस्तकवाचून मी विचारात पडलो की, हे पुस्तक का लिहिले गेले असावे ? मग मला जाणवले की, भारतातील सार्वजनिक वादविवाद आणि बौद्धिक विविधतेचा वारसा दाखविण्याच्या उद्देशाने ते लिहिले गेले. तसेच, अनेकांना काहीसाआत्मकेंद्री, संकुचित आणि बुद्धिप्रामाण्यविरोधी वाटणार्या हिंदुत्वाविरुद्ध तो एक युक्तिवाद होता. अचानक मला उजव्या हिंदुगटांचा अमर्त्य सेनांविरुद्धच्या क्रोधाचा अर्थ समजला.
मला आणखी एका चित्तवेधक गोष्टीची जाणीव झाली की, अमर्त्य सेनहिंदुत्ववाद्यांच्या भारतासंदर्भातीलदृष्टिकोनाशी असहमत आहेत आणि हिंदुत्ववादी अमर्त्यांच्या भारतासंदर्भातील दृष्टिकोनाशी असहमत आहेत.
भारतीय चर्चापद्धती (भाग १)
स्वरूप
वादविवादातील सहभागी घटक, वादाचे पद्धतिशास्त्र आणि खंडन-मंडनाचीप्रक्रिया यांचा निर्देश भारतीय परंपरेत मूलतः आहे. तिचे यथार्थ स्वरूपसमजावून घेणे ही विद्यमान लोकशाही स्वरूपाच्या भारतासारख्या बहुधार्मिक, संस्कृतिबहुल देशाची बौद्धिक गरज आहे. येथील विविध तऱ्हांच्या समस्यासार्वजनिकरित्या सोडविण्याच्या हेतूने अनेक विचारसरणीच्या अराजकीय, राजकीयआणि सामाजिक गटांमध्ये सुसंवाद होण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरणारी आहे.या पद्धतीचे अभ्यासपूर्ण विवेचन करणाऱ्या लेखाचा हा पहिला भाग. पुढील भागआगामी अंकांतून प्रकाशित होतील.
—————————————————————————–
‘वाद’ हा मराठी शब्द विविध अर्थांनी वापरला जातो.एक:इंग्लिशमधील’ism’ म्हणजेतत्त्वज्ञान, व्यवस्था किंवा विशेषतः राजकीयविचारसरणी हा अर्थ; जसे की मार्क्सवाद. दोन:भांडण आणि तीन: वैदिक परिभाषेत विधी-अर्थवाद.
पुरस्कार: स्वीकार आणि नकार
अलीकडे चर्चेत राहिलेल्या साहित्यिकांच्या पुरस्कारवापसीच्या पार्श्वभूमीवर एका तरुण लेखकाचे विचारप्रवृत्त करणारे हे मनोगत. युवा साहित्य अकादमी पुरस्कार स्वीकारताना त्याने केलेल्या भाषणासह. मराठीतील या नव्या दमाच्या लेखकाचे हे विचारमंथन आपल्याला आश्वस्त करणारे आहे. ‘एकरेघ’ या लेखकाने चालवलेल्या ब्लॉगवरून साभार.
—————————————————————————–
कन्नड साहित्यिक एम.एम. कलबुर्गी यांची हत्या आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात दादरी इथं गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून झालेली अखलाख या मुस्लीम व्यक्तीची हत्या, हे अगदी अलीकडचे प्रसंग. या व इतर काही प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर काही साहित्यिकांनी ‘साहित्य अकादमी’ या सरकारस्थापित स्वायत्त संस्थेचे पुरस्कार परत केल्यासंबंधीच्या बातम्या गेल्या काही दिवसांमध्ये येत आहेत.
सामाजिक मानसशास्त्राच्या संदर्भात मतभिन्नता
समूहाच्या मताच्या विरुद्ध जाऊन आपला आवाज व्यक्त करणे हे महत्त्वाचे आहेच. पण याबद्दलचे मानसशास्त्रीय अभ्यास काय सांगतात? सामाजिक मानसशास्त्रातील एका प्रसिद्ध प्रयोगाची तोंडओळख करून देणारा हा लेख
——————————————————————————–
ओळख
’dissent’ या इंग्रजी शब्दामध्ये फक्त वेगळे मत किंवा विचार एवढेच अपेक्षित नाही, तर ही मतभिन्नता सर्वसाधारण किंवा अधिकृत मतापेक्षा वेगळे मत असलेली आहे. हा ’वेगळा आवाज’ बहुमतापेक्षा वेगळा किंवा अल्पमतातील आवाज आहे. “To dissent is democracy” असे म्हटले जाते ते या संदर्भातच. बहुमतापेक्षा वेगळे मत असणे, ते मांडता येणे आणि ते मांडण्यासाठी जागा असणे म्हणजे लोकशाही जागृत असण्याचे लक्षण आहे.
उंबरीच्या लीला
इंटरनेट आणि विशेषतः मराठी संकेतस्थळांवर सहिष्णुता नांदते आहे का? या प्रश्नाचा या जगाशी चांगला परिचय असणाऱ्या एकीने घेतलेला हा शोध. लेखिका ’ऎसी अक्षरे’ या संकेतस्थळाच्या एक संपादक आहेत.
——————————————————————————–
‘युनेस्को’ने भावना दुखावणं हा रोग जगातला सगळ्यात भयंकर रोग असल्याचं जाहीर केलं आहे; अशी पोस्ट फेसबुकवर दिसण्याची मी रोज वाट बघते.
थोडा श्रॉडिंजरी विचार करायचा तर – (श्रॉडिंजरचा सिद्धांत ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात — श्रॉडिंजरी विचार म्हणजे ‘नरो वा कुंजरोवा’ पण त्यात दोन्ही अश्वत्थामे जिवंत आहेत किंवा दोन्ही जिवंत नाहीत.) एक बाजू ही की, चहाटळ लोकही अशी पोस्ट लिहिणार नाहीत.
राष्ट्रवादाच्या तीरावर
राष्ट्र, राष्ट्रवाद या संकल्पनांचा आणि त्यांच्या प्रासंगिकतेचा एका संवेदनशील मनाच्या लेखकाने आपल्या स्वतःच्या बुद्धी, अनुभव आणि आकलनाच्या कक्षेत घेतलेला शोध.
——————————————————————————–
हा एक जुना प्रसंग आहे. २००५-०६ मधला. मध्य प्रदेशात बडवानीमध्ये ’नर्मदा बचाओ आंदोलना’चं ऑफिस आहे. मी मेधाताईंना प्रथम पाहिलं ते या छोट्याशा ऑफिसमध्ये. माझ्या या पहिल्या भेटीच्या वेळी पुण्यातून माझ्याबरोबर असीम सरोदे आणि शिल्पा बल्लाळ हे दोघेजणही होते. त्या दिवशी बडवानीमध्ये एक मोठी सभा होती. पुष्कळ लोक होते. स्त्रियांची संख्याही लक्षणीय होती. डोक्यावरून लाल-हिरव्या रंगाचे पदर घेतलेल्या स्त्रिया घोळक्याने बसल्या होत्या.