संपादक, आजचा सुधारक’ यांस
जून १९९१ च्या अंकात श्री. दिवाकर मोहनी यांचा ‘धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्न हा विस्तृत लेख आपण प्रसिद्ध केला आहे. त्या लेखाच्या संदर्भातील काही विचार.
श्री. दिवाकर मोहनी आणि तत्सम विचारवंत धर्म, धर्मनिरपेक्षता. सर्वधर्मसमभाव, राष्ट्रीय एकात्मता, इत्यादी संकल्पना, त्यांचा सामाजिक व राष्ट्रीय जीवनातील आविष्कार यांचा विचार तात्त्विक पातळीवरून करतात आणि व्यावहारिक बाजूकडे जाणून दुर्लक्ष करतात. कधी तर वाटू लागते की हे लोक वेड पांघरून पेडगावला निघाले आहेत ! श्री. मोहनी आपल्या प्रतिपादनाची सुरुवातच ‘समजा या शब्दाने करतात, आणि मग ज्या गोष्टी गृहीत धरून चालतात त्यातील काहींची चर्चा एखाद्या महात्म्याच्या वा आचार्याच्या बौद्धिक व भावनिक पातळीवरून करू लागतात.